पुणे | शहरात पावसाच्या हलक्या सरी; दिवसभर ढगाळ वातावरण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आषाढी एकादशीला सकाळपासून चांगली हजेरी लावली. शहरासह उपनगर भागात पावसाच्या हलक्या तर काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. बुधवारी (दि. १७) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील लवासा येथे सर्वाधिक ३३ तर शहर परिसरात पाषाण येथे ६ मिमी पावसाची नोंद झाली.
मागील आठवड्यात सलग तीन दिवस झालेल्या संततधार पावसानंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आणि गेल्या 48 तासात कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली होती. उकाडाही वाढला होता, अशा परिस्थिती पाऊस जून महिन्याप्रमाणे पुन्हा आठ ते दहा दिवसाची विश्रांती घेणार का अशी भिती वाटली.
त्यामुळे शेतकरीही चिंतेत आला. मात्र, आज सकाळपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. काही ठिकाणी एक ते दोन सरी जोरदार पडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
शहर परिसरातील शिवाजीनगर, कोथरूड, एनडीए, पाषाण, वारजे, कात्रज, धनकवडी, स्वारगेट, कोरेगाव पार्क, हडपसर, येरवडा, विश्रांतवाडी, औंध आणि खराडी परिसरात आज हलक्या सरी झाल्या. काळे ढग दाटून आल्यामुळे दिवसभर शहर परिसरात पावसाचे वातावरण होते.
मात्र, आजही पावसाचा जोर समाधानकारक नव्हता. त्यामुळे पुणेकरांसह शेतकरी चांगल्या पावसाची वाट आतुरततेने पाहत आहे. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार तर काही ठिकाणी हलक्या व मध्यम सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झालेला पाऊस
लवासा – ३३, गिरीवन – २२, पाषाण ६, शिवाजीनगर आणि चिंचवड ५, वडगावशेरी – ४, लोणावळा, बारामती – ३, एनडीए, कोरेगांव पार्क, तळेगाव – १ मिमी पावसाची नोंद झाली.





