नाशिक – एकीकडे उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असताना दुसरीकडे काहीसा गारवा देखील जाणवू लागला आहे. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. अशातच आज नाशिक शहरातील काही भागासह ग्रामीण भागात हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील सिन्नर आणि त्र्यंबकेश्वर आदी तालुक्यांत सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या अवकाळी पावसाचा कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा यासह आदी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीटीचा अंदाज वर्तविला आहे. तर उर्वरित भागामध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.