पुणे | शहरात पुढील दोन दिवस हलका पाऊस

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहराचा उष्णतेचा पारा सलग दुसऱ्या दिवशी 40 अंशाच्या खाली आला आहे. त्यामुळे दुपारचा उन्हाचा चटका कमी झाला आहे. ढगाळ वातावरण आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा शिडकाव यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे राहील, तर आकाश ढगाळ आणि दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
जिल्ह्यातील इंदापूरमध्ये सर्वाधिक 39.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर शहर परिसरात कमाल तापमान 36 अंशाच्या खाली गेले आहे. मागील 48 तासात शहरातील कमाल तापमानात चार ते पाच अंशाने घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला असला तरी उकाडा चांगलाच जाणवत आहे.
आता या उकाड्यावर पावसाची फुंकर आवश्यक असून, रविवारी (दि. 26) दिवसभर शहरासह जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण होते. मात्र, जिल्ह्यातील काही भाग वगळता पावसाने हुलकावणी दिली. दरम्यान, पुढील दोन दिवस दुपारी ऊन, अधून-मधून ढगाळ वातावरण तर दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
शहरासह जिल्ह्यातील काही प्रमुख भागातील कमाल तापमान
इंदापूर – 39.1, शिरूर – 38.5, आंबेगाव – 38, मगरपट्टा – 36.6, वडगांवशेरी आणि कोरेगांव पार्क – 36.2, हडपसर – 36, हवेली – 35.8, शिवाजीनगर – 35.7, पाषाण – 35.6, चिंचवड – 35.4, एनडीए – 34.9, तळेगाव – 33.5, पुरंदर – 32.3, लवासा – 31, भोर – 30.4




