केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

चेन्नई : मधुमेहशास्त्राची प्रगती, मधुमेह या आजारात घ्यायची काळजी आणि मधुमेह संशोधन या क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि दिलेल्या समर्पित योगदानाबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचा प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. देश-विदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, आघाडीचे व्यावसायिक आणि वैद्यकांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. जितेंद्र सिंह मधुमेहशास्त्र (डायबेटोलॉजी)चे शिक्षक प्राध्यापक, संशोधक आणि अभ्यासक आहेत. लोकसभेवर सलग तीन वेळा निवडून केंद्रीय मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा स्थान मिळवणारे ते जम्मू काश्मीरातील पहिलेच आहेत, असे त्यांना प्रदान केलेल्या सन्मानपत्रामधये म्हटले आहे.
रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटीस इन इंडिया या डायबेटोलॉजिस्टच्या सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेचे आजीवन सदस्य म्हणून डॉ जितेंद्र सिंह यांना मिळालेल्या सन्मानाचा उल्लेखही या सन्मानपत्रात आहे.डॉ. जितेंद्र सिंह हे उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, वैद्यकीय शिक्षक, लेखक आणि उत्तम वक्ता म्हणून परिचित आहेत. आत्तापर्यंत त्यांना जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, पुडुचेरी कडून सुवर्ण पदक आणि पत्रकारितेसाठी जमना देवी ज्ञान देवी पुरस्कार मिळाला आहे. डॉ जितेंद्र सिंह हे मधुमेहाच्या विविध पैलूंवरील आठ पुस्तकांचे आणि तीन मोनोग्रामचे लेखक आहेत.
मंत्री होण्यापूर्वी, असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या मानाच्या एपीआय टेक्स्टबुक ऑफ मेडिसिनच्या सलग १२ आवृत्त्यांमध्ये त्यांनी मधुमेहावर प्रकरणे लिहिली आहेत.काश्मिरी स्थलांतरितांमध्ये ताणतणावामुळे आढळणारा मधुमेह या विषयावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या कामाचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले होते. गर्भधारणेतील मधुमेह व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणाऱ्या संशोधकांच्या गटाचे ते सदस्य देखील होते. त्यांनी सुमारे दोन डझन विद्यार्थ्यांचे, प्रबंधासाठी मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. संसदेतील कामकाजातील उत्कृष्ट सहभाग आणि भाषणांचे देखील कौतुक त्याना प्रदान केलेल्या या सन्मानपत्रात करण्यात आले आहे.
चार दशकांच्या सेवेचे फळ…
हा पुरस्कार आपल्यासाठी खूप मोठा आहे आणि तो केवळ पुरस्कार प्रदानकर्त्यांच्या विनंतीखातर, आपण अत्यंत विनयपूर्वक आणि नम्रतेने स्वीकारत आहोत. सुमारे चार दशकांच्या प्रवासात देशातील काही दिग्गज वैद्यकीय व्यावसायिकांच्या छत्रछायेखाली तसेच सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला मिळणे हे दैवी वरदान आहे, असेही जितेंद्र सिंह म्हणाले.





