Monsoon fashion : फॅशन नाही, आरोग्य महत्त्वाचे.! पावसाळ्यात ओले कपडे घालण्याची सवय पडू शकते चांगलीच महागात.! एका चुकीने होऊ शकतो मोठा धोका
पावसाळ्यात वेळेअभावी किंवा घाईगडबडीत अनेकजण अर्धवट सुकलेले किंवा ओलसर कपडे परिधान करतात. ही सवय क्षुल्लक वाटत असली तरी आरोग्यासाठी ती धोकादायक ठरू शकते.

Monsoon fashion : पावसाळ्यात सततचा पाऊस, हवेत वाढलेली आर्द्रता आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे कपडे पूर्णपणे सुकणे अनेकदा कठीण होते. वेळेअभावी किंवा घाईगडबडीत अनेकजण अर्धवट सुकलेले किंवा ओलसर कपडे परिधान करतात. ही सवय क्षुल्लक वाटत असली तरी आरोग्यासाठी ती धोकादायक ठरू शकते.
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, ओलसर आणि दमट वातावरण हे बुरशी (फंगस) वाढण्यासाठी अत्यंत पोषक असते. त्यामुळे त्वचेवर खाज, लालसरपणा, पुरळ, दुर्गंधी, त्वचा सोलणे आणि फंगल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.
विशेषतः काख, जांघा, पायांची बोटे, मान, स्तनाखालील भाग आणि शरीराच्या घाम येणाऱ्या जागांवर हा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे पावसाळ्यात वैयक्तिक स्वच्छतेसोबतच कोरडे आणि स्वच्छ कपडे परिधान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
फंगल इन्फेक्शन म्हणजे नेमके काय?
बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गाला फंगल इन्फेक्शन म्हणतात. त्वचा, नखे, केस किंवा तोंडाच्या आतील भागावरही हा संसर्ग होऊ शकतो. सुरुवातीला त्वचेवर गोलाकार लाल चट्टे, तीव्र खाज, जळजळ, त्वचा सोलणे किंवा पांढरे डाग दिसू शकतात.
लक्षणे दिसताच स्वतःहून औषधे न घेता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार अँटीफंगल क्रीम किंवा औषधांचा उपचार केला जातो.
पावसाळ्यात या गोष्टींची विशेष काळजी घ्या :
पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर कोरडे कपडे परिधान करा.
अर्धवट सुकलेले किंवा ओलसर कपडे वापरणे टाळा.
त्वचा आणि केस पूर्णपणे कोरडे करूनच कपडे घाला.
दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या, त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवा.
जास्त प्रमाणात मेकअप टाळा आणि त्वचा स्वच्छ ठेवा.
ओठ कोरडे पडत असल्यास लिप बामचा वापर करा.
बाहेर पडताना आवश्यक असल्यास त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीनचा वापर करा. ढगाळ वातावरणातही अतिनील किरणांचा काही प्रमाणात परिणाम होत असतो.
संसर्ग टाळण्यासाठी काय कराल?
काही प्रकारचे फंगल इन्फेक्शन एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे संक्रमित त्वचेच्या संपर्कातून किंवा टॉवेल, कपडे, मोजे यांसारख्या वैयक्तिक वस्तूंच्या वापरातून पसरू शकतात.
त्यामुळे इतरांचे कपडे, टॉवेल किंवा वैयक्तिक वस्तू वापरणे टाळावे. घरात एखाद्याला फंगल इन्फेक्शन असल्यास त्यांचे कपडे वेगळे धुवावेत आणि वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.
तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला :
फंगल इन्फेक्शनकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग वाढू शकतो आणि उपचारांचा कालावधीही लांबू शकतो. खाज, लालसरपणा, त्वचा सोलणे किंवा वारंवार होणारा त्वचेचा त्रास जाणवत असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पावसाळ्यात कोरडे कपडे, योग्य स्वच्छता आणि संतुलित आहार या तीन गोष्टींचे पालन केल्यास फंगल इन्फेक्शनसह अनेक त्वचारोगांपासून स्वतःचे संरक्षण करता येते.








