Lifestyle: थंडीत आपण थोडं तिखट, आंबट काहीतरी खायचा विचार केला की सगळ्यांत आधी आठवतं ते म्हणजे लोणचं. पण हिवाळ्यात लोक आंब्याचं लोणचं कमी खातात. अशावेळी लसूण, आले आणि हिरवी मिरची यांचं मिक्स लोणचं हा एक मस्त आणि हेल्दी पर्याय ठरू शकतो. लसूण व आलं दोन्हीही उष्ण असल्यामुळे थंडीत आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. लसूण–आले–मिरचीचं लोणचं खाण्याचे फायदे लसूणमध्ये मँगनीज, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C, कॅल्शियम, आयर्न, झिंक, सेलेनियम अशा अनेक पोषक घटकांबरोबरच अॅलिसिन नावाचा शक्तिशाली कंपाऊंड असतो. आलं पचन सुधारण्यास, शरीरातील सूज कमी करण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. हे लोणचं थंडीत होणारा खोकला, श्वसनाचे त्रास, अंगदुखी आणि सूज कमी करण्यात उपयुक्त. लोणच्यासाठी लागणारे साहित्य लसूण – 100 ग्रॅम आलं – 100 ग्रॅम हिरवी मिरची – 15 ग्रॅम बडीशोप – 2 टीस्पून धणे (साबुत) – 2 टीस्पून जिरे – 1 टीस्पून मेथीदाणे – ½ टीस्पून मीठ – 2 टीस्पून हळद – 1 टीस्पून काश्मिरी लाल तिखट – 2 टीस्पून हिंग – ½ टीस्पून मोहरीचं तेल – ½ कप लिंबू – 2 (रस) व्हिनेगर – 1 टीस्पून (ऐच्छिक, शेल्फ लाईफ वाढते) लोणचं बनवण्याची तयारी 1. लसूण सोलून स्वच्छ करा. मोठ्या पाकळ्या असतील तर मध्ये काप करा. 2. हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन पुसून त्यांना लांबीने चीरा द्या. 3. आलं धुऊन सोलून बारीक आणि लांब काप करा. कसे बनवायचे लोणचं? 1. मसाला तयार करा: धणे, बडीशोप, जिरे आणि मेथी हे मसाले 2–3 मिनिटे हलकेसे भाजून घ्या. थंड झाल्यावर ओबडधोबड वाटून घ्या. हवं असल्यास थोडी मोहरी किंवा काळ जिरंही घालू शकता. 2. मोठ्या बाउलमध्ये लसूण, आलं आणि मिरची घालून त्यात मीठ आणि हळद टाकून नीट मिसळा. हे मिश्रण किमान 2 तास तसेच ठेवून द्या. 3. दोन तासांनी जर पाणी सुटलं असेल तर ते वेगळं काढा. 4. आता तयार मसाला, काश्मिरी तिखट आणि हिंग हे मिश्रणात घालून व्यवस्थित मिक्स करा. 5. मोहरीचं तेल धूर येईपर्यंत गरम करा. गॅस बंद करून हे गरम तेल लसूण–आले–मिरचीच्या मिश्रणात घाला. 6. शेवटी लिंबूरस आणि हवं असल्यास व्हिनेगर घाला. कसं साठवायचं? तयार लोणचं स्वच्छ, कोरड्या आणि एअरटाइट बरणीत भरावे. दोन–तीन दिवस सूर्यप्रकाशात ठेवल्यास लोणचं छान मुरतं आणि चव अधिक उठून येते. हे लोणचं अनेक महिने टिकतं, फक्त ओलसरपणा लागू देऊ नका. हिवाळ्यात गरमगरम जेवणासोबत हे तिखट, लसूण–आले–मिरचीचं लोणचं एकदम परफेक्ट!