Life With Corona : गड्या आपला गाव बरा

– समीर कोडीलकर
शहराच्या समाज जीवनावर नजीकच्या भविष्यात दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असून ते दीर्घकाळ टीकतील असे अनेक समाज अभ्यासकांचे मत आहे. करोनाच्या धास्तीने स्थलांतरितांचे लोंढे आपल्या गावी परतले आहेत. शेकडो पावले त्या दिशेने निघाले अहोत. त्यामुळे “खेड्याकडे चला’ हा नवा ट्रेंड येत आहे.
“करोनोत्तर शहर’ याबाबत विविध स्तरांवर विचार विनिमय सुरू आहे. व्यावसायिक परिणामांची चर्चा अधिक असली तरी त्यातून होणारे सामाजिक बदल दूरगामी असतील. शहरातील व्यवसायात खेड्यातून आलेल्या कष्टकऱ्यांचा श्रमाचा वाटा मोठा आहे. बहुतांश दुकलानातील कामगार हे खेड्यातून आलेले आहेत. मात्र, करोनाच्या साथीमुळे ते धास्तावलेले आहेत. आज त्यांना आपले गाव सुरक्षित वाटू लागले आहे. त्यातून त्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे.
झोपड्यांना कुलूप
झोपडपट्टीमध्ये अनेक जणांच्या झोपडीला कुलूप लावल्याचे दिसत आहे. येथे मरण पत्करण्यापेक्षा गावी जाऊन आपलं मीठ भाकरी खाऊ, अशी मानसिकता अनेकांची बनली आहे. आपण आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेऊन हा वर्ग लवकर परत येण्याची शक्यता तूर्त नजरेस येत नाही. त्यामुळे घरकामगार आणि दुकानातील कामगार यांचा तुटवडा जाणवणार आहे.
स्वावलंबी बनावे लागणार
इतके दिवस बाई येईल, ती स्वच्छता करेल या विचारात असणाऱ्यांना आता स्वावलंबी बनावे लागेल. त्यामुळे घराच्या स्वच्छतेपासून धुण्याभांड्यांपर्यंत स्वत:ची कामे स्वत:च करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या सवयी मोडून स्वावलंबनाचा मंत्र आत्मसात करणे ही काळाची गरज असणार आहे.





