भीमा नदीवरील महाकाय पुलाचे आयुष्य ‘धोक्यात’

खेड – राज्यभराला जोडणाऱ्या व अनेक जिल्ह्याची सीमारेषा असलेल्या बारामती-अमरापूर राज्यमार्गावरील खेड नजीक भीमानदीवर बांधलेल्या महाकाय पुलाची मोठी दुर्दशा झाली आहे. सध्या हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे जीर्ण होऊन अखेरच्या घटका मोजत आहे.
पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या पुलाकडे कायमच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षांपासून या पुलावर फुटभर उंचीचे खड्डे पडले आहेत. सध्या हे खड्डे पावसाच्या पाण्याने किंवा वाहनातील सांडपाण्यामुळे कायमच भरलेले दिसतात. हे खड्डे आकाराने मोठे असल्याने या खड्ड्यात डोकून पाहिले तर पुलाच्या मजबूतीकरणासाठी वापरण्यात आलेले लोखंडी स्टील कुजलेल्या जीर्ण अवस्थेत दिसून येते. पावसाळ्यात तर या खड्ड्यात सततच पाणी भरल्याने अनेक वाहनांचे अपघात होत आहेत तर काही दुचाकी वाहने अंदाज न आल्याने खड्ड्यात पडत आहेत.
पुलापासून भिगवण आणि राशीन दिशेकडे जाणारा मार्ग अगदी सुसाट झाला आहे मात्र पुलाची ही दुरावस्था सर्वांचीच डोकेदुखी बनली आहे. सध्या खड्ड्यांमुळे पुलावर ‘मणका मोडेल असा दणका’ या म्हणीचा नेते सोडले तर सर्वसामान्य जनतेला प्रत्यय येऊ लागला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून राज्यमार्ग झाला खरा, मात्र संबंधित पूल हा जुनाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदार असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांच्याकडून केवळ नव्या राज्यमार्गावर लक्ष दिले जात असून पुलाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नेत्यांकडे महागड्या आलिशान गाड्या!
या खड्ड्यातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. रोहित पवार, आ. राम शिंदे आदींसह अनेक बड्या नेत्यांच्या गाड्या कायम जातात मात्र, या गाड्या आलिशान असल्याने कोणताही खड्डा जाणवत नसल्याने त्यांच्याकडून कसल्याही सूचना संबंधितांना करण्यात येत नाहीत हे विशेष. सामान्य नागरिकांना मात्र हे खड्डे दवाखान्याचा मार्ग दाखवत आहेत.




