Canteen license cancelled : आमदार निवासाच्या कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द; निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे मोठी कारवाई

Canteen license cancelled : निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या कारणावरून शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदारा निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण केली होती. ही घटना मंगळवारी ८ जुलै रात्री घडल्याने दुसऱ्या दिवशी दिवसभर या घटनेची मोठी चर्चा होती. विधिमंडळातीन दोन्ही सभागृहात या प्रकाराचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. आता या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार निवासातील कॅन्टीनमधील अजंता केटरर्सचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कॅन्टीनमधील पदार्थांची एफडीएनकडून तपासणी करण्यात आल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
लवकरच अहवाल सादर केला जाणार
गायकवाड यांनी निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर अन्न आणि प्रशासन विभागाने घेतली. या विभागाचे पथक कॅन्टिनमध्ये दाखल झाले. पथकाकडून आमदार निवासाच्या कॅन्टिनमधील स्टोअर रूमची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान खाद्यपदार्थ आणि तेलाच्या बाटल्यांचे सॅम्पल घेण्यात आले असून, पुढे फॅारेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. स्टोअर रूमचे अॅाडिटही करण्यात आले असून, लवकरच तपासणीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी ८ जुलैच्या रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कँन्टीमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. कर्मचाऱ्याला मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. आमदार संजय गायकवाड यांनी खराब जेवण दिले गेल्याच्या कारणावरून कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. कॅन्टीनमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
मंगळवारी ८ जुलै या दिवशी रात्री १० वाजता आमदार संजय गायकवाड यांनी या कॅन्टीनमधून जेवण मागवले. पहिला घास घेताच काहीतरी गडबड असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी याबाबत कॅन्टीन चालकाला जाब विचारला. सर्वांना अन्नाचा वास घ्यायला सांगितला. तिथे असणाऱ्या सर्वांना ते खराब वाटले, असे गायकवाड यांनी सांगितले. विषासारखे अन्न खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तरीही त्यांनी ऐकलेच नाही. त्यामुळे त्यांना माझ्या पद्धतीने समजावलं, असे संजय गायकवाड यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?
मी ३० वर्षांपासून आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये येत आहे. कॅन्टीनमध्ये चांगले अन्न पुरवण्याची वारंवार विनंती केली. अंडी १५ दिवस जुनी, नॉन-व्हेज १५-२० दिवस जुने, भाज्या २-४ दिवस जुन्या असतात. जवळपास ५,००० ते १०,००० लोक येथे दररोज जेवतात. प्रत्येकाची जेवणाबाबत तक्रार आहे. कोणाला अन्नात पाल सापडते, तर कोणाला उंदीर किंवा दोरी सापडते. त्यांनी केलेल्या गंभीर दाव्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित करण्यात आली आहे.
हेही वाचा : Pune Gramin : महुडे मार्गावर एसटी बस पलटी, शाळकरी मुलींचा थोडक्यात बचाव; रस्ता रुंदीकरणाची मागणी तीव्र





