ILT20 League 2025 : ६,६,६,६,६….केकेआरच्या फलंदाजाचा मोठा धमाका! एकाच षटकात ठोकले तब्बल ‘इतके’ षटकार

लिविंगस्टोनची तुफानी खेळी –
अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनने आयएलटी२० लीग २०२५ मध्ये वादळी खेळी करून आपली किंमत आणखी वाढवली आहे. त्याने अबु धाबी नाइट रायडर्स आणि शारजाह वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात मोठा धमाका केला. या सामन्यात अबु धाबी नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या लियाम लिविंगस्टोनने ३८ चेंडूंमध्ये ८२ धावांची अत्यंत स्फोटक खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच संघाला ४ गडी गमावून २३३ धावांची मोठी धावसंख्या उभारता आली आणि संघाने हा सामना ३९ धावांनी जिंकला.
एकाच षटकात ठोकले पाच षटकार –
LIAM LIVINGSTONE UNLEASHING – 33 RUNS FROM AN OVER. 🤯pic.twitter.com/d9Z7b40EhT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 3, 2025
विशेष म्हणजे, लियाम लिव्हिंगस्टोनने शेवटच्या षटकात ड्वेन प्रीटोरियसच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. त्याने या षटकात ५ षटकार ठोकत एकूण ३३ धावा वसूल केल्या. या षटकातील पहिलाच चेंडू त्याने सीमारेषेपार पाठवला. त्यानंतर प्रीटोरियसने एक वाईड चेंडू टाकला. पुढच्या चेंडूंवर लिविंगस्टोनने दोन धावा धावून पूर्ण केल्या आणि मग सलग चार षटकार लगावले. अशा प्रकारे, त्याने या एकाच षटकात पाच षटकारांसह एकूण ३३ धावा वसूल केल्या.
हेही वाचा – AUS vs ENG : जबरदस्त! कॅरीने झेल घेण्यासाठी लाबुशेनला दिली जोरदार धडक; थरारक झेलचा VIDEO व्हायरल
सीएसके आणि केकेआरमध्ये ‘बिडिंग वॉर’ची शक्यता –
आगामी लिलावात सर्व फ्रँचायझींना आपल्या संघात एका स्टार अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. मात्र, ऑक्शनमध्ये केवळ कॅमेरून ग्रीन आणि लियाम लिव्हिंगस्टोन ही दोनच मोठी नावे उपलब्ध असल्याने, सर्व फ्रँचायझी त्यांच्यामागे धावण्याची शक्यता आहे. या मिनी ऑक्शनमध्ये सीएसके आणि केकेआर या दोन संघांकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे.
त्यामुळे हे दोन्ही संघ लिव्हिंगस्टोन आणि ग्रीन यांच्यावर मोठी बोली लावू शकतात. खासकरून, या दोन संघांमध्ये लिव्हिंगस्टोनला घेण्यासाठी मोठी ‘बिडिंग वॉर’ पाहायला मिळू शकते. मात्र, जर ऑक्शनमध्ये कॅमेरून ग्रीनचे नाव आधी आले आणि त्यावर मोठी बोली लागली, तर लिव्हिंगस्टोनच्या किमतीवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे.





