पुणे – शिक्षणानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व अफगाणी विद्यार्थ्यांच्या पाठीशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंडियन कॉन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स पूर्ण ताकदीने उभे राहू, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि इंडियन कॉन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी संयुक्तरित्या दिली.
पुणे विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अफगाण विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे आणि सरहद संस्थेचे संजय नहार यांच्या पुढाकारातून या औपचारिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यापीठाच्या अफगाण माजी विद्यार्थी संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या हेल्प-लाइनचे देखील कुलगुरूंच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ज्या अफगाण विद्यार्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तोडगा म्हणून 020-25621938 हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
कुलगुरू म्हणाले, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील वसतिगृहात ज्या विद्यार्थ्यांना राहणे कठीण किंवा असुरक्षित वाटत असेल अशा अफगाण विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सेंटर वसतिगृहात सोय करण्यात येईल.
ज्या विद्यार्थांना त्यांच्या पालकांकडून पैसे येणे बंद झाले आहे, त्यांच्यासाठी सहानभुतीपूर्वक विचार करण्यात येऊन त्यांना शुल्कात माफी किंवा शुल्कात कपात देण्यासंदर्भात गांभीर्याने विचार केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्यांना रोजगाराची नितांत गरज आहे अशा विद्यार्थ्यांना देखील सर्वोतोपरी मदत केली जाईल.
विनय सहस्रबुद्धे यांनी दूरध्वनीवरून विद्यार्थ्यांना आश्वस्त करत सांगितले, “अफगाणी विद्यार्थ्यांनी स्वतःला एकटे समजू नये. जे विद्यार्थी सुट्टीनिमित्त अफगाण गेले होते आणि ते तिकडे अडकून पडले आहेत, त्यांना भारतात येण्याच्या दृष्टीने परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधत त्यांची व्हिसा प्रक्रिया कशी सुलभ होईल या दृष्टीनेदेखील पत्रव्यवहार करून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल.’
=======================