“दुष्काळी 22 गावांच्या शेतीला पाणी मिळू द्या”; नंदकिशोर देवस्थानला कृती समितीचे साकडे

इंदापुरात आजी-माजी लोकप्रतिनिधींनी शेतीला पाणी मिळवून देण्याची मागणी
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात असणाऱ्या 22 गावांच्या शेती फुलवण्यासाठी, हक्काचे पाणी शासनाकडून मिळू दे असे साकडे 22 गाव कृती समितीने युवक नेते ऍड. नितीन कदम यांच्या उपस्थितीत शेकडो शेतकऱ्यांनी निरवांगी येथील प्रसिद्ध नंदकिशोर देवस्थानला अभिषेक करून साकडे घातले.
यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना कृती समितीचे ऍड. नितीन कदम म्हणाले की, आमच्या अनेक पिढ्या 22 गावातील शेतीला पाणी मिळावे, यासाठी झगडत राहिल्या; मात्र शासनाची उदासीनता प्रत्येक वेळेस दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांवर आजपर्यंत पडलेली आहे; मात्र योगायोगाने राज्य सरकारमध्ये तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार दत्तात्रय भरणे काम पाहत आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये असल्याने, या दोन्हीही आजी-माजी आमदारांनी खऱ्या अर्थाने 22 गावातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून शासनाकडे त्वरित पाठपुरावा करून 22 गावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी अपेक्षा ऍड. नितीन कदम यांनी व्यक्त केली.
दुष्काळी पट्ट्यातील शेतीला पाणी मिळावे, यासाठी काहीही करण्याची शेतकऱ्यांची तयारी असून शासनाने शेतकऱ्यांवर उग्र आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये. अन्यथा आजपर्यंतच्या इतिहासात जी आंदोलने झाली नाहीत, अशी उग्र आंदोलने शेतकरी करतील असाही इशारा कृती समितीचे नेते नितीन कदम यांनी दिला आहे.
यावेळी कृती समितीचे युवराज मस्के, मल्हारी जाधव, संतोष वाबळे, गजानन लंबाते, दादाराव सुळ, सुदर्शन रणवरे, कुलदीप रणवरे, आनंदराव रणवरे, इंद्रजीत खोरे, धनंजय रणवरे, नंदकुमार लावंड यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.





