Nhavare : निमोणे परिसरात भरदिवसा बिबट्यांचा मुक्तसंचार
Nhavare : या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी संबंधित मार्गावरुन जाताना अधिक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

न्हावरे : निमोणे (ता. शिरुर) गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, दिवसाढवळ्या बिबट्यांचा मुक्त संचार सुरु असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निमोणे-न्हावरे रस्त्यावर चासकमान कालव्याच्या भरावावर भरदिवसा नर आणि मादी अशा दोन बिबट्यांची जोडी नागरिकांना दिसून आली. निमोणे येथील पिंपळाची वाडी परिसरात रात्रीच्या वेळी पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
निमोणे – न्हावरे रस्ता हा परिसरातील शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांच्या नियमित वर्दळीचा मार्ग आहे. याच रस्त्यावर अचानक दोन बिबटे दिसल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बिबट्यांची जोडी काही वेळ रस्त्यालगत फिरताना दिसून आली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी संबंधित मार्गावरुन जाताना अधिक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
पिंपळाचीवाडी परिसरातही रात्रीच्या वेळी बिबट्या दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात ऊसाचे मोठे क्षेत्र, झाडी, नदीकाठ आणि ओढ्यांचा परिसर असल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध होत आहेत. रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. अनेक शेतकरी एकट्याने शेतात जाणे टाळत आहे. हातात बॅटरी आणि काठी घेऊन गटाने जात आहेत.
बिबट्यांचा वावर मानवी वस्तीजवळ वाढल्याने लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पहाटे दूध घेऊन जाणारे शेतकरी आणि सकाळी शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी रात्री उशिरा एकट्याने बाहेर पडू नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये आणि पाळीव जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधावीत, अशी सूचना स्थानिक पातळीवर देण्यात येत आहेत.
ट्रॅप कॅमेरे बसवा
निमोणे परिसरात बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असतानाही वनविभागाने केवळ नागरिकांना सावधानतेच्या सूचना देऊन थांबू नये. बिबट्यांचा नेमका वावर कोणत्या भागात आहे, त्यांची संख्या किती आहे आणि मानवी वस्तीजवळ येण्यामागील कारण काय, याचा तातडीने शोध घेणे गरजेचे आहे. संवेदनशील ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवून नियमित गस्त वाढवावी. आवश्यक ठिकाणी पिंजरे लावून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
वनविभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे
शिरुर तालुक्यातील इनामगाव येथे काही दिवसांपुर्वी एका लहान मुलीवर पहाटे बिबट्याने अचानक हल्लाने तिचा मृत्यू झाला होता. अशी एखादी गंभीर घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. निमोणे, पिंपळाची वाडी आणि निमोणे-न्हावरे रस्त्यावरील वाढता बिबट्यांचा वावर लक्षात घेता वनविभागाने या भागाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





