बिबट्याचा “मर्सिडीज’ प्रवास; 7 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

महाळुंगे इंगळे/चिंबळी – चाकण औद्योगिक वसाहतीतील कुरुळी-निघोजे (ता. खेड) हद्दीतील मर्सडीज बेंझ कंपनीत बिबट्या शिरल्याची घटना सोमवारी (दि. 21) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती; मात्र सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राची रेस्क्यू टीम, महाळुंगे पोलीस आणि चाकण वनविभाग यांना बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे. कंपनीच्या बॉडी शॉप सेक्शनमधील कामगारांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आले होते. दरम्यान, कंपनीतील सीसीटीव्हीत बिबट्याचा सर्व थरारक धुमाकूळ कैद झाला आहे.
सोमवारी सकाळी 7 वाजता बिबट्या सर्वप्रथम जंगलातून बाहेर आला आणि मर्सिडीज कंपनीच्या पार्किंगमध्ये फिरताना सुरक्षा रक्षकाला दिसला. त्यानंतर कंपनीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो मुक्तपणे फिरताना दिसला. कंपनीत बिबट्या आला तेव्हा मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करत होते. बिबट्याच्या चाहुलीने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने सर्व कर्मचारी घाबरून तेथून बाहेर पडले होते. दरम्यान, हा बिबट्या कंपनी आवारात कुठून आणि कसा आला हे अद्याप समजू शकलेले नाही.
कंपनीच्या आवारामध्ये बिबट प्रजातीचा वन्यप्राणी आढळलेबाबत माहिती मिळाली, त्या अनुषंगाने तात्काळ चाकण वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत बचावपथक, माणिक डोह बिबट निवारा केंद्र येथील रेस्क्यू टिम, महाळुंगे इंगळे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक संदेश पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांच्या नियंत्रणाखाली माणिक डोह बिबट निवार केंद्रांचे पशुवैद्यकीय अधिकारी निखील बनगर, डॉ. शुभम पाटील, आकाश डोळस, वैभव नेहरकर, नितीन खताळ, संतोष आगरकर, अचल गवळी, या बचाव पथकाने सदर नर बिबट्या यास सुरक्षितपणे बेशुध्द करून पकडले. दरम्यान, कंपनीत शिरलेला बिबट्या पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
बेशुद्ध इंजेक्शनचा मारा
नर जातीचा अडीच वर्षांचा हा बिबट्या असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. दरम्यान, बिबट्यावर बेशुद्ध इंजेक्शनचा मारा करून पकडण्यात आले, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
“वन अधिकारी आणि स्वयंसेवकांनी मोठ्या मुश्किलीनंतर सकाळी 11.30 च्या सुमारास बिबट्याला पकडले. चाकण एमआयडीसीमध्ये असलेल्या कंपनीचा बहुतांश भाग जंगलाला लागून आहे. त्यामुळेच हा बिबट्या कंपनीत शिरला असावा. सध्या बिबट्याला जुन्नर येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले असून सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.”
– अरविंद पवार, प्रभारी निरीक्षक, महाळुंगे इंगळे पोलीस ठाणे





