Nevasa : भालगाव-गोधेगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम! हल्ल्यात १२ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला
Nevasa : घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

नेवासे : भालगाव – गोधेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून मंगळवारी (दि२७) रोजी सकाळी पावणेसहा वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका १२ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शिवराज रवींद्र शिंदे, (वय १२ वर्ष) असे हल्ला झालेल्या मुलाचे नाव आहे. हा मुलगा सकाळी पावणेसहा वाजता इतर १० ते १२ जणांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेला असता ऊसाच्या शेतालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि पायावर पंजे मारले सुदैवाने त्याच्यासोबत १०-१२ जण असल्याने सर्वांनी एकच आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली आणि या चिमुरड्याचे प्राण थोडक्यात बचावले. या हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, वनविभागाने या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी यापूर्वीच परिसरात पिंजरे लावलेले आहेत, मात्र हा बिबट्या पिंजऱ्याला गुंगारा देत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आणखीनच वाढले आहे.
वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या कुटुंबीयांची बिबट्याच्या दहशतीने पाचावर धारण बसली आहे. ऊसाच्या दाट शेतात बिबट्याचा वावर असल्याने ऊसतोड कामगारांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली असून, शेतकरी, महिला, लहान मुले आणि सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बिबट्याला तातडीने जेरबंद करून परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.





