पुणे जिल्हा | श्रीक्षेत्र वीर येथे बिबट्याची दहशत

परिंचे, (वार्ताहर) – श्रीक्षेत्र वीर (ता.पुरंदर) जवळील इनामवस्ती येथे अशोक बाळासाहेब धुमाळ यांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला चढवून म्हशीचे रेडकू ठार केल्याने वीर, समगिरवाडी, इनाम वस्ती तसेच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा केला आहे. परिसरात वावरत असलेल्या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच मंजुषा धुमाळ यांनी केले आहे.
समगिरवाडी, इनाम वस्ती तसेच परिसरात वाड्यावस्त्यांवरील विद्यार्थी पायी चालत शाळेला येतात अनेक शेतमजूर या परिसरातून चालत जात असून रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे, त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी सरपंच मंजुषा धुमाळ यांनी केली आहे.
परिसरात वन कर्मचार्यांची रात्रीची गस्त सुरू करण्यात आली असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्या घराबाहेर पडू नये तसेच शाळकरी मुलांच्या बरोबर मोठ्या व्यक्तींने जाऊ काळजी घ्यावी. बिबट्या दिसल्यास वन विभागाच्या 1926 या टोल फ्री नंबर कळवावे. – विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुरंदर तालुका





