Pune Gramin : भोर तालुक्यात कांबरे खेबा गावात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीती, वनविभागाकडे दुर्लक्षाची तक्रार

नसरापूर : भोर तालुक्यातील कांबरे खेबा या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर सातत्याने दिसत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल पहाटे ३.१८ वाजता बुआसाहेब वाडी रोडवरील सदाशिव निवास गेटजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर पुन्हा स्पष्टपणे दिसला. हा व्हिडिओ ग्रामस्थांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करून सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आधीही बिबट्याचे दर्शन झाल्याच्या अनेक घटना घडल्या असून काही पाळीव जनावरांची बिबट्याने शिकार केल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, अद्याप वनविभागाकडून ठोस कारवाई झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माझी पोलीस अधिकारी सुनील शेलार यांनी ग्रामपंचायतीतील सदस्यांना सूचना देताना सांगितले की, “बिबट्या विषयक घटनांबाबत वनविभागाशी अधिकृत पत्रव्यवहार करा. भविष्यात एखादी दुर्घटना झाली तर जबाबदार कोण हे निश्चित व्हायला हवे.”
शेलार यांनी पुढे असेही सांगितले की, “वनविभागाला सांगून त्यांनी रात्रीची गस्त सुरू करावी जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही. गावकऱ्यांनीही सतर्क राहावे आणि बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी.”
सुनील शेलार यांच्या या प्रश्नाला ग्रामपंचायत सदस्यांनी उत्तर देताना सांगितले की, “आम्ही लवकरच वनविभागाशी संपर्क करून आवश्यक ती कारवाई करू.” तरीदेखील, ग्रामस्थांनी तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. सध्या परिसरात लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर न पडता सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





