आंबेगावात पुन्हा बिबट्याचा थरार! दुचाकीवर झडप घालून बिबट्याने तरुणाला ओढण्याचा केला प्रयत्न

प्रभात वृत्तसेवा
मंचर – थोरांदळे (ता.आंबेगाव) गावच्या हद्दीत डोंगरमळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी दि.१ रोजी रात्री आठ वाजता घडली. अमोल अरुण गुंजाळ हे जखमी तरुणाचे नाव आहे. रांजणी ते मंचर रस्त्यावर बिबट हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांमध्ये घबराट पसरली आहे.अमोल अरुण गुंजाळ (रा. जाधववाडी) हा तरुण दुचाकीवरून चांडोली गावावरून जाधववाडी गावाकडे घरी चालला होता.
थोरांदळे गावाच्या हद्दीत डोंगरमळ्यात वेस्टर्न हिल कंपनीलगत बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अमोल गुंजाळ हा तरुण दुचाकीवरून खाली रस्त्यावर पडला. बिबट्याने त्याच्या चेहऱ्यावर पंजा मारला. परंतू तरुणाने प्रतिकार केल्याने डोळ्याच्या खाली बिबट्याचे नखे लागले. तरुणाच्या चेहऱ्यावर हातावर जखमा झाल्या आहेत. दुचाकीवरून पडल्यानंतर देखील बिबट्या तरुणाला ओढून नेण्याचा प्रयत्न करत होता. अमोल गुंजाळ यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी पाठीमागून पिकअप वाहन आले.
त्यावेळी बिबट्या तेथून पळून गेला. अमोल हा जखमी अवस्थेतच घरी गेला. कुटुंबियांना व शेजारच्यांना बिबट हल्ल्याची माहिती दिली. त्याच्या कुटुंबियांनी वनविभागाला ही कळविले. वनरक्षक बी. एच. पोतरे, वनसेवक महेश टेमगिरे यांनी जखमी तरुणाला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
“रांजणी ते मंचर रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मागील महिन्यात चांडोली येथे दुचाकीवर जाणाऱ्या नागरिकांना बिबट्याने जखमी केले होते. चांडोली,थोरांदळे, खडकी फाटा हा परिसर आता दुचाकीस्साठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याने रात्रीच्या वेळी प्रवास करताना एकट्याने करू नये सावधगिरी बाळगावी.”
-संतोष वाघ, माजी अध्यक्ष, नरसिंह पतसंस्था, रांजणी.





