Pune Airport : पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचा वावर; नागरिक भयभीत

पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. सोमवारी (दि.२८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे विमानतळ अधिकारी, सुरक्षा कर्मचारी यांच्यासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याचा शोध सुरू असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लोहगाव विमानतळाच्या मुख्य रन वे जवळ असलेल्या रनवेच्या जवळ बिबट्याचे प्रथम दर्शन झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाची एक टीम घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याचा शोध सुरु आहे.
या घटनेने लोहगाव विमानतळावरील अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोहगावमधील परिसरातही घबराट पसरली आहे. याबाबत बोलताना वन विभागाचे वन अधिकारी सुरेश वरद म्हणाले की, वन विभागाला बिबट्या आढळून आल्याची माहिती मिळताच एक टीम घटनास्थळी रवाना केली आहे. बिबट्याचा शोध सुरू असून लवकरच बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश येईल.
तसेच रेस्क्यू टीम प्रमुख नेहा पंचमिया म्हणाले कि, विमानतळावर बिबट्या असल्याचा फोन आल्यानंतर त्वरित पहिली टीम घटनास्थळी पाठवून देण्यात आली आहे. बिबट्या सदर ठिकाणी असल्याची खात्री झाली असून आता दुसरी टीम देखील घटनास्थळी पोहचेल.





