Leopard: पिंपरखेड भागात बिबट्या जेरबंद; वनविभागाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Leopard : पिंपरखेड बीट क्षेत्रांतर्गत आजपर्यंत मागील सहा महिन्यात तब्बल ५३ बिबट जेरबंद

जांबूत : शिरूर तालुक्याच्या बेट भागात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली असून पावसाळा सुरु झाल्यानंतर बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
मागील घटनांचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाकडून तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी आता परिसरातून जोर धरू लागली आहे. वनविभागाकडून पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मोहीम सुरूच असल्याचे दिसून येते.
बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या पिंपरखेड, काठापूर खुर्द , जांबूत , वडनेर खुर्द, चांडोह, फाकटे, टाकळी हाजी , शरदवाडी परिसरासह पिंपरखेड बीट क्षेत्रांतर्गत आजपर्यंत मागील सहा महिन्यात तब्बल ५३ बिबट जेरबंद करण्यात आले.
बुधवारी (दि.८) रोजी पहाटे पिंपरखेड (ता.शिरूर) येथील दत्तवाडी परिसरात शेतकरी विजय बाळू शिंदे यांचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात मादी संवर्गातील आठ वर्षीय बिबट जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सदर बिबट्याची रवानगी माणिकडोह (ता.जुन्नर) येथील बिबट निवारण केंद्रात करण्यात आल्याची माहिती वनपाल महेंद्र दाते यांनी दिली आहे.
याबाबत जुन्नर वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस म्हणाल्या की, सततच्या पावसामुळे शेतातील वाढलेले गवत , चिखल आणि नैसर्गिक अधिवासातील बदल यामुळे बिबट्यांच्या हालचाली वाढण्याची शक्यता असल्याने शेतात काम करताना समूहाने जाऊन सतर्क रहावे. तसेच अंधार असणाऱ्या काळात शेतात जाणे टाळणे गरजेचे असून लहान मुलांना मोकळ्या जागेत देखील खेळण्यास सोडू नये.
तर घरानजीक असणारी झुडुपे इतर अडगळ साफ करून आडोसा कमी करावा आणि घर, गाईगोठा किंवा वस्तीवर पुरेशी विजेची व्यवस्था करणे गरजेचे असून घराबाहेर किंवा ओट्यावर झोपणे टाळा.
जर आपल्या नजीक बिबट्या निदर्शनास आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती असल्यास तातडीने वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा:
Pune District : घोडनदीला पूर, बेल्हे- जेजुरी राज्यमार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत





