पुणे जिल्हा | बिबट्याची दुचाकीला धडक; तिघेजण जखमी

मंचर, (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला बिबट्याची जोरात धडक बसल्याने दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले असल्याची घटना थोरांदळे (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत शुक्रवारी, दि. १९ रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. धनश्री चेतन जाधव, मिलिंद जाधव, आराध्य चेतन जाधव ही जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जाधववाडी (ता. आंबेगाव) येथील महिला धनश्री चेतन जाधव, मुलगा आराध्य चेतन जाधव व पुतण्या मिलिंद जाधव हे शुक्रवार, दि. १९ रोजी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून मंचर येथून जाधववाडी येथे रात्री घरी जात असताना थोरांदळे गावच्या हद्दीत ते आले असता अचानक रस्ता ओलांडण्यासाठी पळत येणाऱ्या बिबट्याची त्यांच्या दुचाकीला धडक बसली.
या धडकेत दुचाकीवरील तिघेजण खाली रस्त्यावर पडले. तर त्यावेळी बिबट्या देखील काही वेळ रस्त्यावर पडला होता. त्यावेळी रस्त्यावर येणाऱ्या पिकअप चालकांनी जोरात हॉर्न वाजवल्याने बिबट्या पुन्हा झाडांमध्ये पळून गेला. त्यावेळी रस्त्यावर जखमी पडलेल्या धनश्री जाधव, मिलिंद जाधव, आराध्य जाधव यांना स्थानिक ग्रामस्थांनी रांजणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
रांजणी येथे प्राथमिक उपचार करून त्यांना मंचर येथील मॅक्स केअर हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातात आराध्य जाधव व मिलिंद जाधव हे किरकोळ जखमी झाले असून धनश्री जाधव या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.
थोरांदळे गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात बिबट्याचे वास्तव्य असून रात्रीच्या वेळी अनेकदा येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना बिबट्याचे दर्शन होत आहे. या परिसरात पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे. – सोपान घुले, अध्यक्ष, हनुमान दूध संस्था, थोरांदळे.





