Leopard Catch : जुन्नरचा ‘तो’ नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद! डीएनए (DNA) अहवालातून झाला मोठा खुलासा
Leopard Catch : नागपूरच्या वन्यजीव संशोधन केंद्रातून आला डीएनए अहवाल; जेरबंद केलेल्या नर बिबट्याचे नमुने घटनास्थळावरील स्वॅबशी तंतोतंत जुळले.

Leopard Catch – पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) परिसरात मानवावर प्राणघातक हल्ला करणारा नर बिबट्या जेरबंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.पारगाव तर्फे आळे येथील राम भिकाजी भोर यांच्या मालकीच्या गट नंबर 164 मधील शेतात दि. 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने
कांदा काढून विश्रांती घेत असलेल्या रोहन बाबू काफरे (रा. रोहा, जि. रायगड) यांच्यावर हल्ला करून ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली होती. घटनेनंतर जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक राजहंस तसेच माणिकडोह सॉस केंद्राचे डॉक्टर व त्यांची टीम यांनी घटनास्थळी भेट दिली. सॉसच्या डॉक्टरांनी मृत रोहन काफरे यांच्या गळ्यावरील गंभीर जखमेचे स्वॅब नमुने घेतले.
त्यानंतर वरिष्ठ वनाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी सी. एस. कांबळे, वनपाल श्रीमती ढोबळे, वनरक्षक गणपत केदार व सॉस रेस्क्यू टीम यांच्या पथकाने हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी व्यापक मोहीम राबवली. या मोहिमेत 15 पिंजरे व 9 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. अवघ्या दोन ते तीन दिवसांत घटनास्थळाच्या परिसरातून एक नर व एक मादी बिबट्या जेरबंद करण्यात आले.
जेरबंद करण्यात आलेल्या दोन्ही बिबट्यांचे स्वॅब नमुने नागपूर येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार दि. 24 जानेवारी 2026 रोजी फॉरेन्सिक लॅबकडून प्राप्त अधिकृत डीएनए अहवालात, जेरबंद केलेल्या दोन बिबट्यांपैकी नर बिबट्याचा डीएनए घटनास्थळी मिळालेल्या नमुन्याशी तंतोतंत जुळल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली. नरभक्षक बिबट्याची ओळख निश्चित होऊन तो जेरबंद झाल्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.





