तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील टाकळी भीमा रोड ढमढेरे वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर सुरू असल्याच्या वारंवार तक्रारी नंतर अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. तळेगाव ढमढेरे येथील ढमढेरे वस्ती, गुरवमळा, साळूमाळी वस्ती, जगताप वस्ती, चौधरी वस्ती, शिंदे वस्ती, कमेवाडी या परिसरात अनेक दिवसांपासून तीन ते चार बिबट्या फिरत असलेले येथील शेतकऱ्यांना दिसत होते. या भागात मोठ्या प्रमाणात ऊस शेती असल्याने बिबट्याला लपण्यासाठी उसाचा मोठा आधार मिळतो . रात्रीच्या वेळी किंवा काही वेळेस दिवसा शिकारीसाठी बिबट्या बाहेर पडत असल्याने येथील शेतकऱ्यांना त्याचे दर्शन होत होते. शेतील पाणी देण्यासाठी किंवा शेतीची मेहनत करण्यासाठी येथील शेतकरी रात्रीच्या वेळी रानात जातो व महिला खुरपणीसाठी बाहेर पडतात.तसेच शाळा गावात असल्याने विद्यार्थीही पायी किंवा सायकलने या जा करत असतात. मागील आठवड्यात येथील शेतमजुर गोरख आहेर यांच्या पाळीव शेळीचे करडू दिवसा रानात चरत असताना बिबट्याने ओढून ऊसात नेले तर शेतकरी अमोल ढमढेरे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. यामुळे तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थानी केली. यावेळी वनपाल प्रमोद पाटील, प्राणीमित्र संघटनेचे सर्पमित्र शेरखान शेख, शेतकरी अमोल ढमढेरे, शेखर ढमढेरे, योगेश ढमढेरे, संकेत ढमढेरे, अक्षय ढमढेरे, अजय ढमढेरे, संतोष सातपुते, सार्थक ढमढेरे, आदित्य ढमढेरे यांनी पिंजरा आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले.