जांबूत : जांबूत (ता. शिरुर) परिसरात बिबट्यांची वाढती संख्या जीवघेणी ठरत आहे. दहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन बळी गेल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच आता दिवसाढवळ्या देखील बिबट्याचे हल्ले वाढू लागल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शनिवारी (दि, २५) दुपारी एक वाजेच्या सुमारास जांबूत येथील विशाल जुन्नर पतपेढीचे शाखा व्यवस्थापक गणेश गोसावी व लेखनिक कैलास बोरचटे यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून गोसावी यांनी दुचाकीचा वेग वाढवून जोराचा आरडाओरडा केल्याने बिबट्याने शेजारील उसाचे शेतात पळ काढला. याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश गोसावी आणि लेखनिक कैलास बोरचटे आपल्या दुचाकीवरून संस्थांतर्गत कामकाजासाठी बाहेर पडले असता जांबूत येथील एच. पी. पेट्रोलपंपाजवळ असलेल्या ओढ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांचे दुचाकीवर झेप घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखून गोसावी यांनी दुचाकीचा वेग वाढवून जोराचा आरडाओरडा केल्याने बिबट्याने शेजारील उसाचे शेतात पळ काढला. जर आमची नजर चुकली असती तर बिबट्याने आमच्यावर हल्ला केला असता असे भयभीत झालेले गणेश गोसावी व कैलास बोरचटे यांनी सांगितले. शिरुरच्या बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, काठापूर खुर्द, शरदवाडी परिसरात अन्न व पाण्याचा शोधात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून दिवसाढवळ्या अशा प्रकारे जीवघेणे हल्ले वाढू लागल्याने शेतकऱ्यासह शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वनविभागाने या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी संतप्त शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत.