यशवंतनगर : कराड तालुक्यातील नडशी येथील तळी नावाच्या शिवारात आज शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दुचाकीस्वार युवकावर हल्ला केला. यावेळी पाठीमागून दुसर्या दुचाकीवरून येणार्या युवकाने प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. या हल्ल्यात बिबट्याचा पंजा दुचाकीच्या मागील सीटवर लागल्याने सीट फाटली. दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार युवक थोडक्यात बचावला. नडशी येथील युवक समाधान माने शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून तळी नावच्या शिवारातून जात होता. त्यावेळी अचानक बिबट्याने त्याच्या दुचाकीवर झेप घेतली. याचवेळी पाठीमागून दुसर्या दुचाकीवरून आलेल्या अमोल पवारने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने शिवारात पळ काढला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाला घडलेल्या घटनेची माहिती दिली. वनरक्षक सानिका घाडगे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन कॅमेरा ट्रॅप लावला. रात्री उशिरा सातारा येथील वरिष्ठ अधिकार्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. गेल्या काही महिन्यांपासून नडशी परिसरात बिबट्या आणि त्याच्या दोन बछड्यांचा वावर असल्याचे स्थानिकांना दिसून आले आहे. बिबट्या आणि त्याच्या बछड्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या वावराची माहिती सोशल मीडिया ग्रुपवर पसरल्याने ग्रामस्थ भयभीत आहेत. परिसरात लोकवस्ती असल्याने शेळ्या, कुत्री यांना बंदिस्त शेडमध्ये बांधण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत. तसेच रात्री उजेडासाठी दिवे सुरु ठेवावेत. अफवा पसरवू नये, बिबट्याचा फोटो काढण्याचा मोह टाळावा, असे आवाहन वनरक्षक सानिका घाडगे यांनी केले आहे. आमच्यासमोर बिबट्याने चालू गाडीवर झेप घेतली. तो पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत होता. मात्र, आम्ही पाठीमागून जोरात ओरडलो. त्यामुळे तो ऊसात पळून गेला. वेळ चांगली होती म्हणून सुदैवाने बचावलो. – अमोल पवार (ग्रामस्थ, नडशी)