प्रभात वृत्तसेवा मंचर – बिबट्याचा उपद्रवामुळे सध्या आंदोलकांच्या मनात तीव्र भावना असून पुढील दोन-तीन दिवसात शिरूर आंबेगाव तालुक्याच्या दौर्यावर येऊन स्थळ पाहणी करण्यासाठी येईल. तसेच मंगळवारी अकरा वाजता मुंबई मंत्रालयात बैठक घेऊ. आणि बिबट्या संदर्भातील सर्व प्रश्न मार्गी लावू. असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.बिबट्या संदर्भात ठोस उपाय योजना व्हावी, यासाठी आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ पुणे-नाशिक महामार्गावर मंचर जवळील गायमुख फाटा येथे नंदी चौक येथे आंदोलनासाठी बसले असून सकाळी अकरा वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे. वनमंत्री, पालकमंत्री घटनास्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे आमदार शरद सोनवणे, शरदचंद्र पवार पुणे जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष देवदत्त निकम, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, विजय पवार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत घटनास्थळी येण्यासाठी आग्रह केला असता वनमंत्री गणेश नाईक यांनी सध्या आंदोलकांच्या मनात तीव्र भावना असून पुढील दोन-तीन दिवसात पिंपरखेड येथे स्थळ पाहणी करण्यासाठी येईल. असे सांगितले. मंत्रालयात बैठक घेऊ या बैठकीला उच्चस्तरीय अधिकारी, विविध खात्याचे मंत्री उपस्थित राहतील. बिबट्या बाबत अंतिम निर्णय घेऊ असे सांगितले. मात्र आंदोलकांनी वनमंत्री आल्याशिवाय बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या रोहन बोंबे यांच्यावर अंत्यविधी करणार नसल्याचे सांगितले. यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी वन मंत्री गणेश नाईक यांना तुम्ही या ठिकाणी वन अधिकारी व ग्रामस्थ यांच्या बोलण्यात काय तफावत आहे. जाणून घ्या. वन विभागाचे अधिकारी दिशाभूल करत आहे, असे सांगितले.देवदत्त निकम म्हणाले, पहिली घटना 12 तारखेला घडली असून त्यावेळी तुम्ही आठ दिवसात येतो, असे सांगितले मात्र अद्याप आले नाहीत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.