Leopard Attack: पारगाव परिसरात बिबट्याचा थरार! लोखंडी जाळी उचकटून १२० गावरान कोंबड्या केल्या फस्त
Leopard Attack: पारगाव (ता. आंबेगाव) येथे कांताबाई दत्तात्रय मिंडे यांच्या गायींच्या गोठ्यातील खुराड्यावर बुधवारी पहाटे बिबट्याचा हल्ला; १२० कोंबड्यांचा मृत्यू.

Leopard Attack – ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने गोठ्यामध्ये असलेल्या गावरान कोंबड्याच्या खुराड्याची लोखंडी जाळी उचकटून गावरान कोंबड्यावर हल्ला करून त्या फस्त गेल्याची घटना पारगाव (ता.आंबेगाव) येथे बुधवारी (दि.१७) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कांताबाई दत्तात्रय मिंडे यांच्या यांच्या गायांच्या गोठ्यात गावठी गावरान कोंबड्यांचे खुराडे असून या खुराड्यामध्ये १५० गावरान कोंबड्या होत्या.
ऊसात दबा धरून असलेल्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून खुराड्याची लोखंडी जाळी उचकटून खुराड्यात प्रवेश केला. कोंबड्यांवर हल्ला केला आणि कोंबड्या फस्त केल्या. यामध्ये आंदाजे १२० कोंबड्या मृत पावलेल्या असून या शेतकऱ्याचे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे कांताबाई मिंडे यांनी सांगितले. पहाटे कांताबाई मिंडे यांचा मुलगा सुहास मिंडे हे गायींच्या गोठ्याकडे गेले असता खुराड्यातील कोंबड्यां मृत अवस्थेत दिसून आल्या.
त्यांनी वनविभागाला कळवले . वनविभागाचे कर्मचारी पूजा कांबळे यांनी पंचनामा केला व बिबट्याचे ठसे आढळून आल्याचे सांगितले. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तातडीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी रंगनाथ चव्हाण, संतोष चव्हाण,विवेक चव्हाण, शंकर देवडे व ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.





