पुणे/भोर : भोर तालुक्यातील नाटंबी येथील नीरा नदीच्या काठावर असलेल्या महादेवाच्या मंदिराच्या टेकडीवरील देवराई वनखात्याची कोणतीही परवानगी न घेता तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साईबेज कंपनी आणि काही व्यक्तींनी संगनमत करून ही छोटी-मोठी झाडे तोडली असून, यामुळे संपूर्ण देवराई धोक्यात आली आहे. ग्रामस्थांची लेखी तक्रार: कारवाईकडे लक्ष या गंभीर घटनेनंतर नाटंबी येथील ग्रामस्थांनी तातडीने वनखात्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर वनविभाग कायदेशीर कारवाई करणार की नाही, याकडे संपूर्ण नाटंबी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. या वृक्षतोडीच्या घटनेत ट्रस्टचे अध्यक्ष देखील सामील असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गट क्रमांक ४९५ मधील दुर्मिळ वृक्षांची कत्तल नाटंबी येथील गट क्रमांक ४९५ या जागेमध्ये शंभू महादेवाचे मंदिर आहे. ही जागा श्री पद्मावती देवी देवस्थान ट्रस्ट, नाटंबी या विश्वस्त संस्थेच्या नावावर आहे. याच गटातील वनझाडे आणि दुर्मिळ वृक्षांची मागील चार दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. संपूर्ण नाटंबी ग्रामस्थांनी एकत्र येत वनविभागाकडे लेखी स्वरूपात मागणी केली आहे की, या जागेची तातडीने वनविभाग मार्फत पाहणी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करावी. तक्रार दाखल करताना शिवाजी बाबुराव खोपडे, प्रमोद दिनकर खोपडे, पंढरीनाथ लक्ष्मण खोपडे, संदीप धर्म खोपडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.