Lek Ladki Yojana : राज्यात ४५ हजार लाडक्या लेकींची भर; दीड लाख लेकींना लाभ, कसा करायचा अर्ज?

मुंबई : मुलींचा जन्मदर वाढावा या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘लेक लाडकी’ योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नवीन वर्षात ४५ हजार ३२० लेकींची भर पडली आहे. या योजनेचा एकूण १ लाख ५८ हजार ६५२ मुलींना लाभ मिळाला आहे. सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात १० हजार, तर मुंबई शहरात सर्वात कमी १०० मुली लाभार्थी ठरल्या आहेत.
शासनाच्या निकषात बसलेल्या प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर प्रत्येकी पाच हजार प्रमाणे ७९ कोटी ३२ लाख ६० हजार रुपये बँक खात्यात जमा झाल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने एप्रिल २०२४ मध्ये ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. त्यानुसार मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षे होईपर्यंत १ लाख १ हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका, तर शहरी भागात अंगणवाडी सेविकांसह मुख्य सेविकांकडे अर्ज करता येईल. हा अर्ज पडताळणीसाठी शहर आणि ग्रामीण भागातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जाईल. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा अर्ज महिला व बालकल्याण विभागाच्या मुख्य कार्यक्रम अधिकाऱ्यांकडे किंवा उपनगरातील नोडल अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. मंजुरीनंतर लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल.
कोणत्या मुलींना भेटणार लाभ
पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात १ एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या मुलींना या योजनेंतर्गत जन्म झाल्यावर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, बारावीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि १८ वर्ष पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रीतीने एकूण १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ दिला जाणार आहे.





