Leh Violence: लडाखला पूर्ण राज्याच्या दर्जासाठीचे आंदोलन बनले हिंसक; चार ठार, 70 जखमी, Gen Z….

Leh Ladakh Protest: केंद्रशासित प्रदेश लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आणि सहाव्या अनुसूचीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन बुधवारी हिंसक बनले. लेह येथे आंदोलक विद्यार्थ्यांनी दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ केली. यामध्ये भाजप कार्यालयाला आग लावण्यात आली.
आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सुमारे 70 हून अधिक जण जखमी झाले असून, टीव्ही वृत्तांनुसार चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या हिंसाचारानंतर पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 15 व्या दिवशी आपले उपोषण संपवले. हिंसाचारावर दुख: व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, मागण्या मांडण्याचा हा मार्ग नाही.
#WATCH | Leh | On BJP leader Amit Malviya alleging involvement of Congress Councillor Phuntsog Stanzin Tsepag in violence targeted at Leh BJP office today, Activist Sonam Wangchuk says, “Congress doesn’t have such influence here that it can manage to get 5000 youth on the… pic.twitter.com/gmJpJMScIz
— ANI (@ANI) September 24, 2025
भाजपचे आरोप, वांगचुक यांचे प्रत्युत्तर –
हिंसाचारानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी लेहमधील हिंसाचारासाठी काँग्रेस नगरसेवक फुंटसोग स्टॅन्झिन त्सेपाग यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. यावर सोनम वांगचुक यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, काँग्रेसचा या भागात इतका प्रभाव नाही की ते 5000 तरुणांना रस्त्यावर उतरवू शकतील. एक काँग्रेस नगरसेवक रागाच्या भरात रुग्णालयात गेला होता, कारण त्यांच्या गावातील दोन जण जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते.
लेह येथील हिंसाचाराने राजकीय वातावरण तापले असताना, सोनम वांगचुक यांनाही टीकेचा सामना करावा लागत आहे. या आंदोलनाची तुलना नेपाळमधील ‘Gen Z’ आंदोलनाशी केली जात आहे. बुधवारी लेहमधील विद्यार्थ्यांनी हिल काउन्सिलसमोर जमून बंद पुकारला होता. यावेळी लडाख पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे चकमक उफाळली. आंदोलकांनी भाजप कार्यालय आणि सीआरपीएफच्या वाहनाला आग लावली. यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
#WATCH | Leh, Ladakh: BJP Office in Leh set on fire during a massive protest by the people of Ladakh demanding statehoothe d and the inclusion of Ladakh under the Sixth Schedule turned into clashes with Police. https://t.co/yQTyrMUK7q pic.twitter.com/x4VqkV8tdd
— ANI (@ANI) September 24, 2025
आंदोलकांच्या चार प्रमुख मागण्या –
आंदोलकांनी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. याशिवाय, सहाव्या अनुसूचीअंतर्गत संवैधानिक संरक्षण, कारगिल आणि लेह यांना स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ बनवणे आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारवर वचनभंगाचा आरोप करत सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, बुधवारी लेहमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर त्यांनी आपले उपोषण संपवले. त्यांनी हिंसाचाराचा निषेध करताना शांततेचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे लडाखमधील तणावपूर्ण परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष लागले असून, पुढील काळात येथील आंदोलन कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.





