Legislative Council Election: विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून अंबादास दानवेंना उमेदवारी; उद्या सकाळी दाखल करणार उमेदवारी अर्ज
Legislative Council Election: उद्धव ठाकरे यांनी आपल्या जागेवर पक्षातील आक्रमक चेहरा आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

Legislative Council Election: विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल, यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या जागेवर पक्षातील आक्रमक चेहरा आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून दानवे उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 12 मे रोजी निवडणुक प्रक्रिया पार पडणार आहे.
उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. या रिक्त होणाऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी स्वतः निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडली होती. मात्र, ठाकरेंनी स्वतःऐवजी एका निष्ठावान शिवसैनिकाला संधी देण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७ मोठे निर्णय
जबाबदारी समर्थपणे पेलणार – दानवे
या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या जागी एका सामान्य सैनिकाची निवड करून मोठा विश्वास दाखवला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने आणि महाविकास आघाडीच्या सहकार्याने ही जबाबदारी समर्थपणे पेलणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने दानवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असला तरी, अद्याप काँग्रेसने आपली भूमिका अधिकृतपणे स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे काँग्रेस या निर्णयावर काय प्रतिक्रिया देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अंबादास दानवे यांचा परिचय –
अंबादास दानवे यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास अत्यंत प्रभावी राहिला आहे. ८ डिसेंबर १९७० रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जन्मलेले दानवे यांनी जनसंवाद, योगशास्त्र आणि समाजशास्त्र अशा तीन विषयांत एम.ए. पदवी संपादन केली असून, त्यांनी सामाजिक कार्याबद्दल डॉक्टरेटही मिळवली आहे.
१९९८ पासून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि पुढे प्रदीर्घ काळ जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१९ मध्ये ते पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आले होते आणि २०२२ मध्ये त्यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. केवळ राजकारणच नव्हे, तर ‘शिवकवच’ विमा योजना, ‘शिवजलक्रांती’च्या माध्यमातून जलसंधारणाची कामे आणि कोविड काळात गरजूंना केलेली मदत अशा अनेक सामाजिक उपक्रमांमुळे त्यांची जनसामान्यांत पकड मजबूत आहे.
२८ मतांच्या कोट्याची आवश्यकता –
विधान परिषदेच्या या निवडणुकीत विजयाचे गणित पाहता, एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी २८ मतांच्या कोट्याची आवश्यकता आहे. सध्याच्या विधानसभा संख्याबळानुसार भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या महायुतीचे पारडे जड असून त्यांचे किमान ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आहे, ज्यामुळे त्यांचा एक उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर करून ठाकरेंनी मराठवाड्यातील एका खंबीर नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. संजय राऊत यांनीही सोशल मीडियाद्वारे या घोषणेचे स्वागत करत ही निवडणूक महाविकास आघाडी एकजुटीने लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.





