Sudesh Kumar Passes Away : अनेक हिट फिल्म्स देणारा दिग्गज अभिनेता काळाचा पडद्याआड! मुंबईत घेतला अखेरचा श्वास
Sudesh Kumar Passes Away : 60 च्या दशकातील एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Sudesh Kumar Passes Away : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सुदेश कुमार यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आपल्या वेगळ्या अभिनय शैलीने अनेकांची मने त्यांनी जिंकली. सुदेश कुमार काळाच्या पडद्याआड गेल्याने बॅालिवूडवर शोककळा पसरली आहे.
सुदेश कुमार यांनी 1960 च्या दशकात अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘सारंगा’ या चित्रपटातील त्यांच्या वैविध्यपूर्ण अभिनयामुळे त्यांना लोकप्रियता मिळवून दिली.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. हा त्रास अधिक होत असल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीसोबत बोलताना त्यांच्या पत्नी जया धवन यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली.
सुदेश कुमार यांच्या पत्नी जया धवन यांनी सांगितले की, “त्यांना (सुदेश कुमार) श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळेच त्यांना सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आम्ही त्यांना गुरुवारी सकाळी घरी आणले आणि घरीच वैद्यकीय युनिटची व्यवस्था केली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.”
कोण होते सुदेश कुमार?
सुदेश कुमार यांचा जन्म 1931 मध्ये पेशावर येथे झाला. ते लहान असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. एल्फिन्स्टन कॉलेजमधून सुदेश कुमार यांनी विज्ञान शाखेत पदवी घेतली. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी डॉक्टर व्हावे, मात्र त्यांनी अभिनयाची कास धरली.
अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला सुदेश कुमार पृथ्वीराज कपूर यांच्या नाट्यगटात सामील झाले. तिथूनच त्यांनी अभिनयाचे धडे घेतले.
छोटी बहन’ या चित्रपटातील सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेमुळे सुदेश कुमार यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर ते ‘भरोसा’ आणि ‘खानदान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसले. सुदेश कुमार यांनी 1975 च्या ‘उलझन’ या थ्रिलर चित्रपटाची निर्मितीही केली होती.
हेही वाचा : US-Iran War : इराणकडून अमेरिकेला नवीन १४-कलमी प्रस्ताव ; ट्रम्प म्हणाले,”आम्ही विचार करू पण…”





