Pune Gramin : बल्लाळवाडीत कायद्याची जनजागृती; विधी सेवा शिबिर यशस्वीरीत्या संपन्न

ओझर : बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथे मंगळवारी जिल्हा न्यायाधीश आणि तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. एस. नायर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराचे अध्यक्षस्थान जुन्नर सह दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) श्रीमती स्वप्ना घुले यांनी भूषवले.
या शिबिराला जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवदास तांबे, उपाध्यक्ष ॲड. अजिज खान, ॲड. सचिन चव्हाण, ॲड. रणजीत भगत, ॲड. स्वाती दुराफे, ॲड. विनोद खंडागळे, ॲड. प्रविण खंडागळे, न्यायालयीन कर्मचारी प्रशांत मोरतळे, झुंबर शेळके यांच्यासह बल्लाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय नायकोडी, ग्रामविकास अधिकारी गणेश थोरात, ग्रामविकास अध्यक्ष जबाजी डोंगरे, पोलीस पाटील सुरेश डोंगरे, वि.का.सो. बल्लाळवाडीचे सुधीर डोंगरे आणि ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या अध्यक्ष श्रीमती स्वप्ना घुले यांनी सांगितले की, सर्वसामान्यांना कायद्याची पुरेशी माहिती नसते. अशा शिबिरांमधून कायद्याविषयी जनजागृती करणे आणि माहिती पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे.
त्या पुढे म्हणाल्या, “सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार, दोन्ही पक्षकारांनी सामंजस्याने तडजोड करून प्रकरणे न्यायालयाबाहेर मिटवावीत, हा आमचा हेतू आहे.” या शिबिराने ग्रामस्थांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

