114 जागांसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत

पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ओबीसी प्रवर्ग (मागास प्रवर्ग महिला व पुरुष) आणि सर्वसाधारण आरक्षण सोडत येत्या शुक्रवार (दि.29) रोजी चिंचवड येथे होणार आहे. यावेळी 114 जागांसाठी सोडत होणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येणार आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 46 प्रभाग असून नगरसेवकांची 139 संख्या आहे. यापूर्वी पालिकेच्या निवडणूक विभागाने आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी 31 मे 2022 रोजी आरक्षण सोडत काढली होती. त्यात अनुसूचित जमाती महिला 2 व पुरुष 1, अनुसूचित जाती महिला 11 व पुरुष 11, सर्वसाधारण महिला 57 अशा जागांवर आरक्षण सोडत काढण्यात आली होती.
मात्र, यातील एससी आणि एसटीचे प्रभाग कायम राहणार असून 57 जागांसाठी काढलेली सोडत रद्द झाली आहे. त्यामुळे 114 जागांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे. 114 जागांपैकी सुरुवातीला ओबीसींच्या 37 जागांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर महिलांसाठी राखीव प्रभागांची सोडत काढण्यात येणार आहे.
77 सर्वसाधारण जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी दिली.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पालिकेच्या निवडणूक विभागाने आतापर्यंत प्रभाग रचना, एससी, एसटी आरक्षण सोडत, अंतिम मतदार याद्यांचे काम पूर्ण केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.





