पुणे जिल्हा | उजनीत चार कोटींचे मत्सबीज सोडा

इंदापूर, (प्रतिनिधी) – उजनी धरणांमध्ये पुणे व सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून चार कोटी रुपयांचे मत्सबीज सोडण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जनी धरण हे महाराष्ट्रातील गोडया पाण्यातील मासेमारीचे एक महत्वाचे केंद्र आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील हजारो कुटुंब ही उजनी धरणातील मासेवारीवर अवलंबुन आहे. सध्या अनुकूल पर्जन्यमानामुळे उजनी धरण 100 टक्के भरले आहे.
काही दिवसांत धरणातील नदी पात्रांमध्ये सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येईल. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांचे तर सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांची मत्सबीस उजनी धरणांमध्ये सोडण्यात यावीत.
दोन्ही जिल्हा परिषदांच्या नियोजन समितीच्या माध्यमातून उजनी धरणांमध्ये मत्सबीज सोडल्यास उजनी धरण परिसरातील मच्छीमारांना मोठा फायदा होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.





