पिंपरी | गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका!

किवळे, (वार्ताहर) – केंद्र शासन पुरस्कृत उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या स्काऊट आणि गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूर वारीसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांना नवभारत साक्षरता अभियान योजनेची ठळक वैशिष्ट्ये असलेल्या माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. या वेळी साक्षरता विषयक घोषणा देहू फाट्याजवळ देण्यात आल्या.
या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय यादव, उपप्राचार्य सविता नाणेकर, पर्यवेक्षिका विभावरी अभंग उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी माहितीपत्रकांचे वाटप करताना गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका, अज्ञानात आपली अधोगती, शिकण्यातच आहे खरी प्रगती, साक्षरतेकडून समृद्धीकडे अशा घोषणा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील स्काऊटर निलेश मानकर, गाइडर मनीषा कठाळे, वैशाली उगले, अरुण डिंबळे, मिलिंद शेलार, योगेश परदेशी, वाल्हू गांगुर्डे, विवेक ढेरे, ज्ञानेश्वर मराडे, निलेश टिळेकर यांनी केले.




