Laxmikant Berde : मृत्यूनंतरही अपूर्ण राहिली लक्ष्याची ‘ती’ मोठी खंत; वर्षा उसगावकरांचा मोठा खुलासा
निखळ विनोदाने खळखळून हसवणारा अवलिया म्हणजेच लाडका 'लक्ष्या' अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). पडद्यावर येताच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे लक्ष्मीकांत बेर्डे केवळ विनोदी भूमिकेपर्यंतच मर्यादित नव्हते, तर त्यांनी अनेक गंभीर आणि आव्हानात्मक भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारल्या.

Laxmikant Berde : मराठी सिनेसृष्टीला आपल्या निखळ विनोदाने खळखळून हसवणारा अवलिया म्हणजेच लाडका ‘लक्ष्या’ अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). पडद्यावर येताच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे लक्ष्मीकांत बेर्डे केवळ विनोदी भूमिकेपर्यंतच मर्यादित नव्हते, तर त्यांनी अनेक गंभीर आणि आव्हानात्मक भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारल्या. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या या गंभीर अभिनयाची हवी तशी दखल सिनेसृष्टीत घेतली गेली नाही.
आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांसोबत काम करूनही त्यांच्या मनात एक अशी सल कायम राहिली, जी त्यांच्या मृत्यूनंतरही अपूर्णच ठरली. याविषयीची न ऐकलेली खंत त्यांची (Laxmikant Berde) जवळची मैत्रीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी एका मुलाखतीत उघड केली आहे.
वर्षा उसगावकर यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत (Laxmikant Berde) यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या की, लक्ष्याचे अकाली जाणे चटका लावणारे होते; आज तो असता तर एका वेगळ्याच उंचीवर चमकताना दिसला असता. त्या काळात प्रेक्षकांसाठी लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे निव्वळ कॉमेडी असेच समीकरण बनले होते. मात्र, स्वतःमधील एक वेगळा, गंभीर अभिनेता रसिकांसमोर यावा अशी लक्ष्याची मनापासून इच्छा होती.
म्हणूनच जेव्हा दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांना ‘एक होता विदूषक’ या चित्रपटाची ऑफर दिली, तेव्हा लक्ष्याने थेट वर्षा यांना फोन केला. मानधन कदाचित कमी मिळेल आणि भूमिकाही स्त्रीप्रधान नसेल, तरीही या चित्रपटात तू माझ्यासोबत काम करावे असा हट्टच लक्ष्याने त्यांच्याकडे धरला होता.
चित्रीकरणादरम्यानचा अनुभव सांगताना वर्षा उसगावकर भावुक झाल्या. आपले सीन नसतानाही लक्ष्मीकांत सेटवर उपस्थित राहून प्रत्येक बारकाव्यावर लक्ष देत असत. त्या चित्रपटातील त्यांचा अभिनय मनाला खोलवर स्पर्शून जाणारा होता. वर्षा यांच्या मते, त्या चित्रपटातील कामासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळायलाच हवा होता, कारण तो खरोखरच एक ‘अवॉर्ड विनिंग’ परफॉर्मन्स होता.
मात्र, त्या वर्षी तो पुरस्कार लक्ष्याला (Laxmikant Berde) मिळाला नाही आणि हीच गोष्ट त्यांच्या मनाला कायमची बोचत राहिली. जर तो पुरस्कार मिळाला असता, तर त्यांच्या प्रतिभेचा एक नवा पैलू जगासमोर आला असता आणि विनोदी अभिनेत्याच्या साच्यातून ते कायमचे बाहेर पडले असते. आपल्या लाडक्या मित्राची ही न मिळालेली पावती आणि मनातली सल आजही वर्षा उसगावकर यांच्या मनात घर करून राहिली आहे.






