Laxman Hake : वातावरण तापणार ! मनोज जरांगेंना इशारा देत लक्ष्मण हाकेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी न फिरण्याचा निर्धार करत जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून, मराठा समाज एकजुटीने त्यांच्या सोबत उभा राहिल्याचे दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आझाद मैदानात उपोषण करण्यास परवानगी नसली तरी जरांगे यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या मागणीला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीला बेकायदेशीर ठरवत आक्रमक भूमिका घेतली आहे. हाके यांनी जरांगे पाटील यांना थेट इशारा देत म्हटले की, जरांगे यांच्या मागणीमुळे महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते आणि शासनाने त्यांना तथ्ये समजावून सांगितली पाहिजेत. यामुळे मराठा आणि ओबीसी समाजांमधील वाद तापण्याची शक्यता आहे, तर दोन्ही समाजांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
जरांगे यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १० टक्के आरक्षण असूनही मराठा समाज ओबीसी प्रवर्गातूनच सरसकट आरक्षण मागत आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून निघालेला हा मोर्चा मुंबईत पोहोचण्यापूर्वीच उच्च न्यायालयाने आझाद मैदानात आंदोलनास मज्जाव केला आहे. तरीही जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, मराठा समाजाला एकजुटीने लढण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला असून, मराठा समाजाच्या नेत्यांनी सगळी कामे थांबवून मुंबईकडे येण्याचे आवाहन केले आहे.
लक्ष्मण हाकेंची आक्रमक भूमिका
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हाके यांनी म्हटले की, जरांगे यांची ओबीसीमध्ये मराठा समावेशाची मागणी बेकायदेशीर आहे. “मराठा समाज तेवढा मेळवावा आणि ओबीसी मुळासकट संपवावा, असाच जरांगे यांच्या मागणीचा अर्थ होतो,” असा आरोप त्यांनी केला. जरांगे यांना शासनाने तथ्ये समजावून सांगितली नाहीत तर महाराष्ट्रात अराजकता निर्माण होईल, असा इशाराही हाके यांनी दिला. पुढे बोलताना ते म्हणाले, “जरांगे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी समाजाने आंदोलन केले तर त्यांची संख्या जितकी आहे, त्याच्या दहापट ओबीसी बांधव रस्त्यावर उतरतील. महाराष्ट्राच्या रस्त्यांवर ओबीसींची दहापट संख्या दिसेल.” हाके यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी समाजातून मोठे आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे, ज्यामुळे सामाजिक तणाव वाढण्याची भीती आहे.
राजकीय नेत्यांवर हाकेंची टीका
लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळत असल्याचा आरोप करत सत्ताधारी नेत्यांवरही टीका केली आहे. “जरांगे पाटील कधी कोणाची स्तुती करतील आणि कोणाच्या रसदीवर आंदोलन उभे करतील याचा नेम नाही. अजित पवारांच्या आमदारांनी जरांगे यांना रसद पुरवली, तरी जरांगे मुख्यमंत्र्यांविरोधात खालच्या स्तरावर टीका करत आहेत. मात्र तरीही सत्तेतील माणसे जरांगे यांना रसद पुरवत आहेत,” असे हाके म्हणाले. ते पुढे म्हणाले, “ओबीसीच्या मंत्र्यांनी गट तयार करून मुख्यमंत्र्यांशी बोलावे. अन्यथा हा वाद आणखी तीव्र होईल.” हाके यांच्या या वक्तव्याने सत्ताधारी महायुतीतील ओबीसी नेत्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील वातावरण तापण्याची शक्यता
मराठा आणि ओबीसी समाजांमधील हा वाद महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला तापवत आहे. एकीकडे मराठा समाज मुंबईकडे कूच करत असताना दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून विरोधाची धमकी मिळत आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी शिंदे समिती स्थापन केली असली तरी ओबीसीमध्ये समावेशाच्या मागणीला विरोध होत आहे. चार वेगवेगळ्या आयोगांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाकारल्याचा दावा ओबीसी नेते करत आहेत.





