Laxman Hake : लक्ष्मण हाकेंचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र, म्हणाले हा सगळा खटाटोप…

मुंबई : ओबीसी मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसी नेते सरकारवर टीका करत आहेत. शासनाने हैदराबाद गॅझेटियरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. ओबीसी आरक्षणाची मसलत संपल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
जरांगेंचा सगळा खटाटोप राजकीय आरक्षणासाठी होता, यात बळी मात्र ओबीसीचा आणि भटक्या जातसमूहाचा गेला आहे, घटनेमधील सामाजिक न्याय देण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न या एका जीआरद्वारे आपण संपवले आहे, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
हैद्राबाद गॅझेटमुळे कुळातील, गावातील, नातेसंबधातील लोकांना कुणबीकरणाद्वारे ओबीसी होण्याचा मार्ग मोकळा केला आहे साहेब? हा जीआर ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणार हे दाव्याने सांगतो. जे नारायण राणे समितीला जमले नाही, जे गायकवाड आयोगाला जमले नाही, ते तुम्ही केले आहे, कोर्टात या जीआर ला किती अर्थ आहे हे आम्हाला माहिती आहे.
पण आज रोजी ओबीसी आरक्षण संपले आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या भाषेत मराठा जात शासनकरती जात आहे त्यांच्या स्पर्धेत मूळ ओबीसी कसा टिकेल साहेब?, असा सवाल हाकेंनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
आम्ही वारंवार सांगतोय जरांगे हा फक्त मुखवटा आहे. त्यांच्या आडून क्रुर मराठा राजकीय नेते आमदार, खासदार, कारखानदार त्यांचा हेतू साध्य करत आहेत. प्रस्थापित मराठा समाजाला सरंपचपदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत सर्व पदे स्वतःकडे ठेवायची आहेत. गरजवंत मराठ्यांच्या शिक्षण आणि नोकरीशी जरांगेला देणे घेणे नाही.
ईब्लुएसच्या कटऑफचा फरक ओबीसींपेक्षा १५ ते २० गुणांनी कमी आहे. त्यामुळे गजरवंतांची शेकडो लेकरेबाळे पायावर उभारली असती. त्यांचे आयुष्य जरांगे व त्यांच्या आकांनी उध्वस्त केले आहे. आम्ही ओबीसी बांधव आतडी तुटोसतर ओरडून सांगतोय. बलूता अलुता सामाजिक मागास यांच्या स्पर्धेत कसा टिकेल हो, अशी केविलवाणी हाक पत्राच्या माध्यमातून हाकेंनी दिली आहे.





