Pune : पुरोगामी राज्य म्हणायची लाज वाटते

पुणे : राजकारण्यांनी भटक्या विमुक्त समाजाला जाणीवपूर्वक प्रस्थापित होऊ दिले नाही. त्यामुळे आजही आमचा समाज संविधानाबाहेरच ठेवलेला आहे. यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणायची लाज वाटते, अशी खंत लेखक, ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२० व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. २७) लेखक सन्मान आणि शाखा, कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. गायकवाड यांना ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
विविध पुरस्कारांचे वितरण मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते झाले. मसाप विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर, उपाध्यक्ष राजीव बर्वे, मसापचे कार्याध्यक्ष, प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. सुरेश देशपांडे संपादित साहित्य पत्रिकेच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रस्थापित झालेले राजकारणी आपआपल्या जातीधर्मापुढे जाऊ इच्छित नाहीत, ही शोकांतिका आहे. भटक्या विमुक्त समाजाची स्थिती आजही सुधारलेली नाही. आमचे आजचे जीवन भयानकच आहे. संविधानात बदल न झाल्यामुळे आमची साहित्यिक कार्यकर्ता म्हणूनही शोकांतिका झाली आहे, असे गायकवाड म्हणाले.





