Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला ‘या’ पक्षाने विधानसभा लढण्याची दिली ऑफर ऑफर

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोईच्या गॅंगने गोळ्या घालून हत्या केली होती. यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. तसेच काळवीट शिकार प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे हात धुवून लागला आहे. बिश्नोई टोळीकडून सलमानला वारंवार धमक्या मिळत आहे. यानंतर लॉरेन्स बिश्नोई याला आता थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर आली आहे.
‘या’ पक्षाने दिली ऑफर
उत्तर भारतीय विकास सेना हा पक्ष निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्ष आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिश्नोईला पत्र लिहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मधून आमदार झिशान सिद्दीकी विरोधात लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला ही ऑफर देण्यात आली आहे.
काय लिहिले पत्रात?
बाबा सिद्दीकी देशभक्त नाही, लॉरेन्स बिश्नोई देशभक्त आहे. तर लॉरेन्स बिश्नोई हा उत्तर भारतीय समाजाचा आहे. बिश्नोईमध्ये आम्हाला शहीद भगत सिंग दिसतो. त्यामुळे निवडणूक लढवण्यासंदर्भात विचार करावा, अशी विनंती या पत्रामध्ये करण्यात आली आहे.
कोणत्या कारागृहात आहे लॉरेन्स बिश्नोई ?
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरामधील साबरमती कारागृहात आहेत. लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती कारागृहातील सर्वात सुरक्षीत अंडा सेलमध्ये कैद आहे. तो तिकडूनच आपली गॅंग चालवत आहे.





