Rohit Pawar | राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट – रोहित पवार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – वाढत्या गुन्हेगारीने राज्यातील कायदा-सुव्यवस्था स्थिती बिकट झाली आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यात मुख्यमंत्री व गृहमंत्री देवंद्र फडणवीस यांचा अधिक वेळ जात असल्याने त्यांचे कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष नसल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी लगाविला.
माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुण्यासह राज्यातील कोयता गँग, वाहन तोडफोड, महिलांवरील अत्याचार, मारामारी घटनांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री पुण्यात असताना, त्याच दिवशी गुन्हे घडतात, हे आश्चर्य म्हणावे लागणार आहे. गुन्हेगारी घटना थांबविण्याकडे फडणवीसांचे दुलर्क्ष आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कामकाजावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पुण्यात दादागिरी कोणाची?
उद्योग क्षेत्रातील दादागिरी हा पुण्याच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यावर रोहित पवार म्हणाले, पुण्यातील अनेक कंपन्या, उद्योगांना मुद्दाम त्रास देण्याची भुमिका काहीजण घेत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या बाहेरच्या राज्यात प्रामुख्याने गुजरातला जात आहेत. पुण्यातील एमआयडीसीत अजितदादा, एकनाथ शिंदे की भाजपची दादागिरी आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल अशी अवस्था आहे.
नव्या कृषिमंत्र्यांना इशारा..
सरळ काम तर सगळेच करतात. एखादे वाकडे काम करून पुन्हा नियमात बसवणारे असतात त्यांची नोंद ठेवली जाते, असे विधान नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले होते. याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, वाकड्या कामांमुळे महाराष्ट्राची तिजोरी वेडीवाकडी झाली आहे. वाकड्यात काम करण्यासाठी कृषिमंत्रीपद दिलेले नाही. सरळ काम करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही राहतो. वाकडे काम जर झाले तर महाराष्ट्र माफ करणार नाही. आम्हीही माफ करणार नाही.





