संगमनेर : लोकशाही आणि संविधानाच्या नावावर निवडून सत्तेवर यायचे आणि त्यानंतर संविधानाची सर्व मूल्य पायदळी तुडवायची ही भाजपची नीती असून केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेले वक्तव्य ही भाजपाची समाजविरोधी चालत आलेली कायमची प्रवृत्ती असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी व बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकासह आघाडीच्यावतीने आयोजित निषेध आंदोलनात ते बोलत होते. यावेळी मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, शिवसेनेचे अमर कातारी, रिपाईचे बाळासाहेब गायकवाड, प्रा.हिरालाल पगडाल यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, छात्रभारती, पुरोगामी संघटना, महाविकास आघाडी व विविध आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे निषेध आंदोलन करण्यात आले. परभणीमध्ये दलित कार्यकर्त्याचा कोठडीत मृत्यू होतो. त्याची खरी चौकशी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे बीडमधील सरपंचाची हत्या करण्यात आली. यामागे कोण आहे, खरा आरोपी शोधले पाहिजे, या आरोपींना संरक्षण मिळते की काय, अशी शंका आता निर्माण होत आहे.आंदोलन केले म्हणून मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला होतो .त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यास संसदेमध्ये जाण्यापासून खा. राहुल गांधी व इतरांना रोखले जाते. डॉ.आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याच्या घटनेवरून प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी काहीतरी खोटी घटना दाखवून राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे टाकले जातात, हा काय न्याय आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन केले. मा.आ. डॉ.तांबे, रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड , शिवसेनेचे अमर कतारी, प्रा. हिरालाल पगडाल, राजू खरात, अनुराधा आहेर, अनिकेत घुले यांनीही भाजपवर जोरदार टीका केली.यावेळी महाविकास आघाडी व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.