लातुरमध्ये युतीत बंडाळी

अभिमन्यू पवारांच्या उमेदवारीला भाजपमधूनच मोठा विरोध
लातूर : तिकीट वाटपानंतर भाजप-शिवसेना युतीला बंडाळीचे ग्रहण लागले आहे. कारण राज्यात सर्वच ठिकाणी नाराजांनी बंड पुकारल्याचे पाहायला मिळत आहे.
लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपने मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक भाजपमधूनच त्यांना मोठा विरोध होत आहे. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील आणि औसामधील काही नेत्यांनी तीन तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत निदर्शने केली. यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने काल (1 ऑक्टोबर) 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना लातूरच्या औसा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. “आम्हाला मुख्यमंत्र्यांचा पीए नको भूमिपुत्र द्या, अशी मागणी या नेत्यांची आहे.
शिवसेनेच्या दिनकर माने यांनी दोनवेळा औशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर गेल्यावेळी कॉंग्रेसच्या बसवराज पाटील यांनी ही जागा खेचून आणली. यावेळी पुन्हा उमेदवारी मिळेल अशी शिवसेना नेत्यांची अपेक्षा होती, पण मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवार यांच्यासाठी ही जागा शिवसेनेकडून सोडवून घेतली.
खरंतर संभाजी पाटील-निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यात सुप्त संघर्ष आहे. औसामधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अभिमन्यू पवार यांच्याविरोधात उभारलेल्या बंडाला संभाजी पाटील-निलंगेकर यांची फूस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एका अर्थाने संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, औसा मतदारसंघात भाजपच्या अभिमन्यू पवार यांना कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे आव्हान आहे.





