Latif Bhat Encounter: कुलगाममधील चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भट ठार; शरण येण्यास नकार
शरण येण्याच्या प्रस्तावाला दिला होता नकार

Latif Bhat Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख कमांडर लतीफ भट ठार झाला आहे. मशिदीत लपलेल्या भटला सुरक्षा दलांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्याला शरणागती पत्करण्याचे आवाहन केले होते.
चकमकीचा समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, एक अधिकारी भटला “आम्ही तुझ्यासोबत आहोत,” असे म्हणताना ऐकू येतो. मात्र, भटने शरणागती पत्करण्यास नकार देत “मला अल्लाहकडे जायचे आहे. मी खूप आनंदी आहे,” असे म्हणताना दिसत आहे.
पहाटेच्या सुमारास पुन्हा गोळीबार सुरू झाला, कारण सुरक्षा दलांनी कुलगाममधील अनेक गावांमध्ये आपली मोहीम अधिक तीव्र केली होती. भटचा साथीदार, उमर निसार दार, सोमवारी कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत मारला गेला होता. निसार आणि लतीफ हे दोघेही ११ नोव्हेंबर रोजी सीआरपीएफ चौकीवर झालेल्या हल्ल्यात सामील होते.
स्थानिक रहिवासी असलेल्या दारने लतीफ भटसोबत मिळून हल्ल्याच्या तयारीसाठी अनेक ठिकाणांची पाहणी केली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “१० नोव्हेंबर रोजी उमर निसार दारने लष्कर कमांडर लतीफ भटसोबत मिळून मीर बाजार, अखरान, हबलिश आणि किलामासह अनेक ठिकाणांची पाहणी केली होती.” त्यांचा उद्देश संभाव्य लक्ष्ये शोधणे आणि सुरक्षा दलांवर हल्ल्यांचे नियोजन करणे हा होता.
दारने सहा महिन्यांपासून दिला होता भटला आश्रय
तपासातून असे समोर आले आहे की, निसार दार गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून लतीफ भटला आश्रय आणि मदत पुरवत होता. स्थानिक दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला लतीफ भट, २२ जुलै रोजी अनंतनागमध्ये पोलिसांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही सामील होता.
चकमकीच्या ठिकाणाजवळ उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, लतीफ भटशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला होता, जेणेकरून त्याला हिंसाचाराचा मार्ग सोडून शरण येण्यासाठी प्रवृत्त करता येईल. पण मशिदीत लपून बसलेल्या लतीफ भटने शरण येण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी त्याचा चकमकीत खात्मा करण्यात आला.
दरम्यान, कुलगामच्या सरकारी पदवी महाविद्यालयाचा पदवीधर असलेला भट, लष्कर-ए-तैयबा/टीआरएफ (LeT/TRF) मध्ये सामील होण्यापूर्वी सुतारकाम करत असे. तो 2025 च्या पहिल्या तिमाहीत या संघटनेत सामील झाला होता. त्याचे वय केवळ 22 वर्षे होते.
हेही वाचा :





