आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह! शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची त्वचा भाजली

वाशीम – राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर घटना वाशीम जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जिल्हा रुग्णालयात अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे, ही दुर्घटना घडून गेल्यानंतरही डॉक्टरांकडून नातेवाईकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
शिरपूर येथील अताऊल्ला खान यांना पोटदुखीच्या त्रासामुळे खासगी रुग्णालयात सोनोग्राफी करण्यात आली होती. सोनोग्राफीत त्यांना अपेंडिक्सच्या त्रासाचे निदान झाले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना वाशीम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
19 मे रोजी त्यांच्यावर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, दोन दिवसांनंतर जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले, तेव्हा हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
सदरील घटनेबाबत कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे विचारणा केली असता, डॉक्टरांनी ही बाब हलक्यात घेतली. तसेच ही घटना “तांत्रिक बिघाडामुळे अनावधानाने घडली” असल्याचे सांगितले.
मात्र ही चूक एवढी गंभीर असताना नातेवाईकांना वेळेवर माहिती न देणे, ही गंभीर दुर्लक्षाची बाब असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.





