Maharashtra Village : महाराष्ट्रातील ‘या’ गावात एक डास मारल्यावर मिळतात 400 रुपये; एकेकाळी जिथं खायला नव्हतं, आज तिथले लोक बनले कोट्यवधी
महाराष्ट्रातील एक गाव देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. या गावात 'एक डास मारून दाखवला तर तब्बल ४०० रुपयांचे बक्षीस' देण्याची घोषणा आहे.

Maharashtra Village – भारतामध्ये अनेक गावं वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. काही गावं शेकडो वर्षांच्या परंपरा आणि रूढींमुळे चर्चेत असतात, तर काही गावं ग्रामस्थांनी घेतलेल्या वेगळ्या आणि दूरदृष्टीच्या निर्णयांमुळे ओळखली जातात.
काही ठिकाणी सापांना घरातील पाळीव प्राण्यांप्रमाणे वागवले जाते, तर केरळमधील एका गावाला ‘जुळ्यांचं गाव’ म्हणून ओळख मिळाली आहे. अशाच वेगळ्या कारणामुळे महाराष्ट्रातील एक गाव देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. या गावात ‘एक डास मारून दाखवला तर तब्बल ४०० रुपयांचे बक्षीस’ देण्याची घोषणा आहे.
हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही गोष्ट खरी आहे. हे गाव म्हणजे महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील ‘हिवरे बाजार’ हे गाव आहे. आज भारतातील आदर्श गावांपैकी एक मानले जाते.
एक डास पकडून दाखवला तर ४०० रुपये देणार :
हिवरे बाजार गावातील ग्रामस्थांचा दावा आहे की, त्यांच्या गावात जवळजवळ डास आढळत नाहीत. गावातील स्वच्छता, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि सांडपाणी नियंत्रण यामुळे डासांची उत्पत्तीच होत नाही.
त्यामुळे ग्रामस्थांनी मजेशीर पण आत्मविश्वासपूर्ण आव्हान दिले आहे, कोणीही या गावात एक डास पकडून दाखवला तर त्याला प्रत्येक डासामागे ४०० रुपये दिले जातील.
गावात स्वच्छता राखण्यासाठी कठोर नियम पाळले जातात. सांडपाणी साचू दिले जात नाही, घराभोवती स्वच्छता राखली जाते आणि गावातील सर्वांनी मिळून आरोग्यदायी वातावरण तयार केले आहे.
एकेकाळी दुष्काळाने होरपळलेले गाव :
आज समृद्ध असलेले हिवरे बाजार गाव एकेकाळी तीव्र दुष्काळाने त्रस्त होते. १९८० ते १९९० च्या दशकात येथे पाण्याची प्रचंड टंचाई होती. पिण्याच्या पाण्यासाठीही लोकांना संघर्ष करावा लागत होता. शेती कोरडी पडली होती आणि अनेक कुटुंबांनी गाव सोडून स्थलांतर केले होते.
मात्र गावकऱ्यांनी हार मानली नाही. त्यांनी एकत्र येऊन गावाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. १९९० च्या सुमारास गावात संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली.
यामध्ये गावचे सरपंच ‘पोपटराव पवार’ यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात. त्यांनी गावच्या विकासाची धुरा सांभाळली आणि गावात मोठा कायापालट घडवून आणला.
या समितीच्या माध्यमातून गावात जलसंधारण, वृक्षलागवड आणि पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन सुरू झाले. ग्रामस्थांनी श्रमदान करून बंधारे बांधले, विहिरी खोदल्या, झाडे लावली आणि पाण्याचे स्रोत जतन केले.
या कामांसाठी सरकारच्या महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून आर्थिक मदतही मिळाली. काही वर्षांतच या प्रयत्नांचे परिणाम दिसू लागले. जेथे एकेकाळी पाणी नव्हते, त्या गावात आज भूजल पातळी ३० ते ३५ फूटांपर्यंत वाढली आहे.
पाणी वाचवण्यासाठी कठोर निर्णय :
हिवरे बाजार गावाने पाण्याचा वापर नियंत्रित करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. ग्रामसभेने जास्त पाणी लागणाऱ्या पिकांवर बंदी घातली. त्यामध्ये: ऊस, भात आणि ज्वारी यांचा समावेश होता.
त्याऐवजी कमी पाण्यात येणारी आणि अधिक उत्पन्न देणारी पिके घेण्यावर भर दिला गेला. उदाहरणार्थ: कांदा, बटाटा आणि भाजीपाला या निर्णयामुळे शेती उत्पादन वाढले आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढले.
करोडपतींचं गाव म्हणून मिळाली ओळख :
आज हिवरे बाजार हे भारतातील सर्वात समृद्ध गावांपैकी एक मानले जाते. या गावात सुमारे ३०५ कुटुंबे असून गावाची लोकसंख्या १,२५० इतकी आहे. त्यापैकी ८० पेक्षा जास्त कुटुंबे करोडपती असल्याचे सांगितले जाते. तसेच ५० पेक्षा जास्त कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
हे यश अचानक मिळालेले नाही. नियोजनबद्ध जलसंधारण, शाश्वत शेती आणि ग्रामसभेच्या निर्णयांचे काटेकोर पालन यामुळे गावाची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. ‘हिवरे बाजार’ हे केवळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध गाव नाही, तर ते उत्तम ग्रामव्यवस्थेचेही उदाहरण आहे.
विकासाचा आदर्श मॉडेल :
‘हिवरे बाजार’ या गावात पाणी वापराचे नियोजन, वृक्षलागवड , स्वच्छता, दारूबंदी आणि लोकसहभाग या गोष्टींवर विशेष भर दिला जातो. त्यामुळे हे गाव ग्रामीण विकासाचा आदर्श मॉडेल म्हणून देशभरात ओळखले जाते.
एकेकाळी दुष्काळ, स्थलांतर आणि गरिबीने त्रस्त असलेले हिवरे बाजार आज स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि सामूहिक नेतृत्वाचे उदाहरण बनले आहे.








