Weather Update : देशभरातील काही राज्यात अचानक थंडी, तर काही राज्यात पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून महाराष्ट्रातही तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत पारा घसरला आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही काळ थंडी कमी झाली आणि तापमानात वाढ नोंदवली गेली. मात्र आता पुन्हा थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये सध्या कडाक्याची थंडी असून तापमान सातत्याने घसरत आहे. उत्तर भागात वाढलेल्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता असून काही भागांत थंडीची लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुपारनंतर अनेक शहरांमध्ये ढगांची दाटी दिसून आली. थंडीबरोबरच वायू प्रदूषणातही मोठी वाढ झाली असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. राज्यातील तापमानाची स्थिती पाहिली तर धुळे येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. परभणी येथे ६.६ अंश, अहिल्यानगरमध्ये ८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. जळगाव, पुणे, मालेगाव, भंडारा, नाशिक आणि गोंदिया येथे तापमान सुमारे १० अंश सेल्सिअसच्या आसपास होते. राज्यातील काही भागांत येत्या काळात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. हवेची गुणवत्ता खालावली मुंबई आणि परिसरात हवेची गुणवत्ता खालावल्याने चिंता वाढली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर परिसरात वायू प्रदूषणाचा स्तर वाढलेला दिसतो आहे. कल्याण तालुक्यात हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमान १९ अंश तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. वा-याचा वेग मंद असल्याने हलकी थंडी जाणवेल.