Pune District : विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षकांना दुचाकीची गुरुदक्षिणा
Pune District : सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक किरण नरवडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक किसन हरपुडे, सहकारी शिक्षक पाटील गोरडे, पल्लवी गायकवाड यांचेही विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

शिरूर: यावर्षीपासून इयत्ता चौथीसाठी सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कान्हूर मेसाई येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे. चौथीतीलनऊ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्तायादीत स्थान मिळविले. शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पालक, शाळा व्यवस्थापन समितीने वर्गशिक्षक किरण नरवडे यांना दुचाकी वाहन गुरुदक्षिणा म्हणून भेट दिली. पालकांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचे हे अनोखे उदाहरण ठरले आहे.
हिंदवी शंकर ननवरे हिने २७६ गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुणवत्तायादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रिदा रियाज मुलाणी (२६०), सान्वी योगेश पुंडे (२६०), ईश्वरी विलास सुरवसे (२५८), स्वरा सचिन ननवरे (२५४), अनुष्का राहुल पुंडे (२५४), दुर्वांक गणेश पुंडे (२५२), मनीष आनंदा पुंडे (२४८) आणि नित्या योगेश पुंडे (२४४) यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक किरण नरवडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक किसन हरपुडे, सहकारी शिक्षक पाटील गोरडे, पल्लवी गायकवाड यांचेही विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.
वर्षभर सातत्याने अध्यापन, शाळेच्या वेळेनंतर घेतलेले जादा तास, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेली अभ्यासाची आवड, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांवरील विश्वास यामुळे हे यश मिळाल्याचे मुख्याध्यापक हरपुडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी शिक्षकांनी शाळेच्या वेळेपलीकडेही सातत्याने वेळ दिला. पालक, शाळा व्यवस्थापन समितीने खंबीर साथ दिल्यानेच हे चमकदार यश शक्य झाले,” असे हरपुडे यांनी नमूद केले. यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पुंडे, सर्व संचालक मंडळ, ग्रामपंचायत प्रशासक आशिया तांबोळी, योगेश पुंडे, शांताराम ननवरे, दिनेश पुंडे, अमोल पुंडे, बबन शिंदे, विद्या विकास मंडळाचे सचिव सदाशिवराव पुंडे, आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
‘गुरुदक्षिणे’ची अनोखी परंपरा
विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांनी घेतलेल्या अथक परिश्रमाची जाणीव ठेवत पालकांनी वर्गशिक्षक नरवडे सरांना दुचाकी भेट देत कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांच्या मेहनतीचा असा सन्मान आणि पालकांकडून दिलेली ही अनोखी ‘गुरुदक्षिणा’ परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.





