पाबळ : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘एकल’ महिलांसाठी विशेष व परिपूर्ण योजना पुणे जिल्ह्यासाठी प्रस्तावित केली जात असून, या योजनेची शिरूर तालुक्यातील अंमलबजावणी जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरणार आहे. या योजनेनुसार एकल महिलांना स्वत:चे घर, निरामय आरोग्य, अर्थिक स्थिरता, निश्चित उत्पन्न, व्यवसायासाठी कर्ज, मुलांचे संगोपन व शिक्षण व्यवस्था या सुविधा कसलीही अडवणूक होऊ न देता हेलपाटे न मारता उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी शिरूर तालुक्यातील पंचायत समिती, ग्रामपंचायती, आशा वर्कर, आरोग्य सेविका यांनी हे शिवधनुष्य खांद्यावर घेतले असल्याची बाब पाबळ येथे झालेल्या चौथ्या महिला मेळाव्यात स्पष्ट झाली. अत्यंत प्रभावी व पारदर्शक पद्धतीने ही योजना राबवली जाणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले. नुकताच पाबळ येथे तब्बल 400 महिलांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी स्वतः प्रस्तावित केलेल्या, माझे अस्तित्व – शक्ती एकल महीलांसाठी या उपक्रमाचे विस्ताराने सूतोवाच केले. यातून एकल महिलांचे जीवनात निर्माण झालेला अंधार निश्चित दूर केला जाईल, असे प्रतिपादन केले.